अमरावती : देशाचं संविधान या देशात सर्वोच्च स्थानावर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात या देशाचं संविधान निर्माण झालं. संविधानाच्या मूळ प्रतमध्ये जे आहे, ते जाणीवपूर्वक समाजापुढं येऊ दिलं गेलं नाही. संविधानाच्या मूळ प्रतमध्ये आपला देश हा धर्मनिरपेक्ष असा कुठलाही उल्लेख नाही, असं राज्याचे माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी म्हटलं. हा देश हिंदूंचाच आणि हिंदूचा अर्थ हिंदुस्थानात राहणारे सर्व अशा अर्थानं होतो, असं देखील जगदीश गुप्ता यांनी स्पष्ट केलं.
जगदीश गुप्ता नेमकं काय म्हणाले? :"देशाच्या संविधान सभेनं संविधान प्रतमध्ये वरच्या ठिकाणी समाजाला प्रेरणादायी चित्रीकरणाचा निर्णय घेतला. हे काम शांतिनिकेतनकडे सोपविण्यात आलं. संविधानाच्या मूळ प्रतमध्ये मोहेंजोदडो पासून राम, कृष्ण, भगवान बुद्ध, महावीर, छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंह, बादशाह अकबर त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस, गांधीजी या सगळ्यांचं चित्रीकरण असून याचा उद्देश आपला भूतकाळ आणि आपण कोणामुळं ईथपर्यंत पोहोचलो, याची माहिती पुढच्या पिढीला व्हावी असा होता. आपल्या अमरावतीत माझ्या सिपना महाविद्यालयात आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेत संविधानाची मूळ प्रत आहे. त्यामध्ये हे सारं काही पाहायला मिळतं. विशेष म्हणजे संविधानाच्या मूळ प्रतमध्ये धर्मनिरपेक्षता असा शब्द कुठंही दिसत नाही," असं जगदीश गुप्ता म्हणालेत.
माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचं मोठं विधान (Source - ETV Bharat Reporter) आणीबाणीत आला धर्मनिरपेक्षता शब्द : "देशात आणीबाणी लागू झाल्यावर विरोधी पक्षातील सर्वच नेते हे कारागृहात होते. त्यावेळी संविधानात दुरुस्ती करून त्यात धर्मनिरपेक्षता हा शब्द टाकण्यात आला. मूळ संविधानात धर्मनिरपेक्षता हा शब्दच नाही. यामुळं भारत हा हिंदूंचा देश असून ज्याप्रमाणं अमेरिकेत राहणारा अमेरिकन त्याप्रमाणेच हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदूच आहे, असं आम्ही मानतो. विशेष म्हणजे आपल्या देशातील सर्व धर्मांचा आदर देखील आम्ही करतो. जो कोणत्याही देवाधर्माची उपासना करत असेल पण आपल्या मातीशी एकनिष्ठ असेल त्या सगळ्यांना आम्ही हिंदू मानतो," असं देखील जगदीश गुप्ता म्हणाले.
अपक्ष लढत असलो, तरी मी भाजपाचाच : लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघात पहिल्यांदा कमळ हे चिन्ह मिळालंय. पक्षाच्या विजयाकरीता आम्ही प्रामाणिकपणानं काम केलं. लोकसभा निवडणुकीदरम्यान कार्यकर्त्यांनी मला पुन्हा एकदा निवडणूक लढवून अमरावती शहरातील गतवैभव परत आणावं, ही विनंती केली. 25 वर्षांपूर्वी अमरावतीचं वातावरण हे अतिशय आपुलकीचं होतं. मटक्यासारख्या अवैध धंद्याविरुद्ध मी स्वतः त्यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केलं. आज मात्र संपूर्ण शहरात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय. अमरावती शहरातील या गुंडगिरीला आवर घालणं हा माझा पहिला उद्देश आहे. ही निवडणूक मी अपक्ष जरी लढत असलो, तरी मी भाजपाचाच आहे. मी निवडून आल्यावर निश्चितच भाजपाचाच असेन, असं देखील जगदीश गुप्ता यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा
- शिवसेनेनं 15 उमेदवारांची यादी केली जाहीर; भाजपा नेत्या शायना एनसींना शिवसेनेकडून तिकीट
- "महाराष्ट्रातील जनता गहारीचा डाग..."; पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर हल्लाबोल
- रिपब्लिकन पक्षाला 'या' 2 जागा, महायुतीकडून रामदास आठवलेंची नाराजी दूर