छत्रपती संभाजीनगरStudents poisoned by milk: जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सकाळी दुधातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास दूध देण्यात आल होतं. त्यानंतर काही वेळात मुलांना उलटी, मळमळ होण्यास सुरवात झाली. ही बाब लक्षात येताच काही मुलांना खुलताबाद येथील तर, जास्त त्रास होणाऱ्या विद्यार्थ्यांना वेरुळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शालेय प्रशासनानं दिली आहे.
96 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली :तिसगाव येथील आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थी निवासी शिक्षण घेत असून शासनाकडून विद्यार्थ्यांना निवास आणि भोजनाची सोय केली जाते. या ठिकाणी अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या 317 आबे, विद्यार्थ्यांना आश्रम शाळा प्रशासनाच्या वतीनं पिण्यासाठी दूध देण्यात आलं होतं. हे दूध पिताच विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या, जुलाब यासारखा त्रास जाणवू लागला. त्यामुळं काही विद्यार्थी अस्वस्थ झाले होते. संबंधित आदिवासी शाळा प्रशासनानं तातडीनं 96 विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय खुलताबाद तसंच काही विद्यार्थ्यांना वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. आरोग्य केंद्रात विद्यार्थ्यांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची शाळेतील शिक्षकांनी दिलीय.