मुंबई - हलाखीच्या परिस्थितीत खचून न जाता बऱ्याच मुलींनी जिद्दीनं स्वतःचं अस्तित्व निर्माण केल्याचं आपण पाहिलंच असेल. अशाच कुलाब्यातील रुचिता नावाच्या मुलीनं परिस्थितीवर मात करीत सीए होऊन दाखवलंय. तीन बाय दहाची खोली अन् वडील नरिमन पॉईंट भागात प्रत्येक ऑफिसमध्ये जाऊन पेपर टाकायचे अन् रद्दी गोळा करायचे. अभ्यास करायचा म्हटलं तरी व्यवस्थित पाय लांब करून बसता येत नाही, इतक्या छोट्याशा तीन बाय दहाच्या घरात अभ्यास करून एका रद्दी गोळा करणाऱ्याच्या मुलीने वयाच्या 22 व्या वर्षी सीएची परीक्षा उत्तीर्ण होत आपल्या वडिलांचं नाव उज्ज्वल केलंय. आजपर्यंत तुम्ही अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या यशोगाथा पाहिल्या असतील. मात्र, ही यशोगाथा थोडी वेगळी आहे. ही गोष्ट एका अशा मुलीची आहे, जिनं आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर मात करीत वडिलांच्या कष्टाचं चीज केलंय. ही यशोगाथा आहे रुचिता चौबे या तरुणीची.
पहिल्याच प्रयत्नात सीएची परीक्षा उत्तीर्ण : देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक सीएची परीक्षा मानली जाते. ज्याप्रमाणे यूपीएससीची परीक्षा पास होण्यात अनेकांचं वय निघून जातं, तसेच सीएच्या परीक्षेचंसुद्धा आहे. पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न असे कितीतरी प्रयत्न झाले तरी अनेकांना ही परीक्षा पास होता येत नाही. मात्र, रुचिता चौबे हिने वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात सीएची परीक्षा उत्तीर्ण होऊन दाखवलंय. हे माझं एकट्याच यश नसून माझ्या आई-वडिलांचं आणि दोन मोठ्या भावंडांचं यश असल्याचं रुचिताचं म्हणणं आहे.
कॉलेज अन् त्यानंतर पुन्हा अभ्यास : ईटीव्ही भारतशी बोलताना रुचितानं सांगितलं की, सकाळी सहा वाजता मला आई उठवायची. सकाळी सहा वाजता उठले की, फ्रेश होऊन अभ्यासाला बसायचे. मग नाश्ता केल्यानंतर पुन्हा अभ्यास करायचे. थोडा चहा प्यायले की पुन्हा अभ्यासाला बसायची. मग कॉलेज अन् त्यानंतर पुन्हा अभ्यास, असा दिनक्रम सुरू होता. तसेच जवळपास 12 ते 14 तास माझे केवळ अभ्यासात जायचे. इतर गोष्टींसाठी मला वेळच नाही मिळायचा. आम्ही ज्या घरात राहतो ते घर इतरांना खूप लहान वाटतं. पण मी लहानाची मोठी याच घरात झाल्याने मला त्याचं काही वाटत नाही. अभ्यास करण्यासाठी मला वाचनालयात जाण्याची गरज भासली नाही. मी माझ्या परीक्षेची सर्व तयारी आणि अभ्यास याच घरात केलाय.
दोन्ही मोठ्या भावंडांची मला मदत : रुचितानं सांगितलं की, "मी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आता घरात आनंदाचं वातावरण आहे. माझ्या अभ्यासासाठी माझ्या दोन्ही मोठ्या भावंडांनी मला खूप मदत केलीय. आता सीए झाल्यानंतर मला माझ्या घरच्यांसाठी काहीतरी करायचंय. एक चांगलं घर घेऊन मोठ्या घरात राहायला जायचं आहे," अशी इच्छादेखील रुचितानं व्यक्त केलीय. रुचिता सुरुवातीपासूनच हुशार आहे. तिला दहावीत 94 टक्के तर बारावीमध्ये 90 टक्के मिळाल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलंय.
मी स्वतः दहावीच्या परीक्षेत दोन वेळा नापास : रुचिताचे वडील कमलेश चौबे यांनी सांगितलं की, 1993 मध्ये मी मुंबईत आलो. 1995 मध्ये मी कुलाब्यातील घरी राहायला आलो. सुरुवातीपासूनच आमची परिस्थिती हलाखीची होती. मी स्वतः दहावीच्या परीक्षेत दोन वेळा नापास झालोय. पण लेक पहिल्या प्रयत्नात सीएची परीक्षा उत्तीर्ण झालीय. त्यामुळे आमच्या घरी आनंद आहे. दुसरीकडे रुचिताच्या आईने सांगितलं की, "ती ज्या पद्धतीने अभ्यास करायची, तिची मोठी मोठी पुस्तके बघून या एवढ्या कठीण परीक्षेत पहिल्या प्रयत्नात यश येईल, असं आम्हाला वाटलं नव्हतं. पण रुचिता पहिल्या प्रयत्नात पास झाल्याने आता समाधान आहे. आजूबाजूच्या वस्तीतील लोकदेखील जेव्हा रुचिताचे कौतुक करतात, तेव्हा समाधान वाटतं," अशा भावनाही आईनं बोलून दाखवल्या.
हेही वाचा-