आग्रा : आग्र्यातील किल्ल्यावर यंदाही शिवजयंती (chhatrapati shivaji maharaj jayanti) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल, उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री योगेंद्र उपाध्याय यांच्यासह बॉलिवूड अभिनेता विकी कौशलही उपस्थित होता. यावेळी बोलताना "आग्र्यात जिथं छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं, तिथं शिवरायांचं भव्य स्मारक उभारणार आहे," अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. तसंच हे शिवस्मारक पाहण्यासाठी ताजमहालपेक्षा अधिक लोक नाही आले, तर नाव बदलून ठेवा, असंही ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? : आग्र्यातील रामसिंगची कोठी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. ती कोठी आज 'मीना बाजार' या नावानं ओळखली जाते. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्र सरकार ही जमीन अधिग्रहीत करेन आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारेल. मी स्वत: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी यासंदर्भात बोलेल. एकदा तिकडं स्मारक होऊ द्या, आईशप्पथ घेऊन सांगतो, ताजमहालपेक्षा जास्त लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं हे भव्य स्मारक पाहण्यासाठी येतील." तसंच महाराष्ट्र सरकार औरंगजेबाच्या नजरकैदेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुटकेचा दिवस 'युक्ती दिवस' म्हणून साजरा करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
औरंगाबादचं नाव बदललं : पुढं ते म्हणाले, "औरंगजेबाचं सैन्य वेतनासाठी लढत असे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे देशासाठी लढत असत. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी यांनी औरंगजेबाला सळो की पळो करुन सोडलं आणि दख्खन विजयाचं स्वप्न घेऊन महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच खोदण्यात आली. त्या औरंगाबादचं नाव आम्ही 'छत्रपती संभाजीनगर' केलं. कारण औरंगजेब हा आपला पूर्वज नाही अन् आपला नायकही नाही."
12 किल्ल्यांचं जागतिक वारसा स्थळांसाठी नामांकन : "पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पहिल्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याआधी रायगडावर आले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा आणि शक्ती मागितली. यामुळंच आज भारत पुन्हा एकदा जगात प्रतिष्ठा प्राप्त करत आहे. पंतप्रधान मोदी बलशाली भारताची निर्मिती करताय, तर आम्ही बलशाली महाराष्ट्र तयार करण्याचा प्रयत्न करतोय. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांच्या 12 किल्ल्यांचं युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांसाठी नामांकन दाखल केलंय," असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा -