अमरावती Firing On Shivsena Leader :अमरावतीच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि अमरावती जिल्हाप्रमुख गोपाळ अरबट यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली. जिल्ह्यातील वलगाव ते दर्यापूर मार्गावर ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी गाडीवर तीन गोळ्या झाडल्या. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
शिंदे गटाच्या दुसऱ्या जिल्हाप्रमुखावर आरोप :गोळीबाराच्या घटनेबाबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी वलगाव पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे दुसरे जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांच्या सांगण्यावरून माझ्या गाडीवर गोळीबार करण्यात आल्याची तक्रार नोंदवली. एकापाठोपाठ तीन गोळ्या झाडण्यात आल्या असून, कारच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. आरडाओरडा केल्यावर हल्लेखोर पळून गेल्याचंही गोपाल अरबट यांनी तक्रारीत नमूद केलं.
माझा संबंध नाही : गोपाल अरबट यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात अरुण पडोळे यांनी "या घटनेशी माझा काहीही संबंध नाही. मी सोमवारी रात्रीच कामानिमित्त मुंबईला निघालो होतो. या घटनेबाबत मंगळवारी सकाळीच मला माहिती मिळाली. हा गोळीबार नेमका कोणी केला? याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी करावी," असं सांगितलं. त्यामुळं पडोळे यांनी हे आरोप फेटाळले आहेत.