बीड- खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अटकेनंतर मस्साजोग ग्रामस्थांनी तीन फरार असलेल्या आरोपींच्या अटकेची मागणी लावून धरली आहे. सरपंच संतोष देशमुख प्रकरणाशी संबंध असलेले तीन आरोपींना अटक करा, अशी मागणी करत मस्साजोग ग्रामस्थांनी आज जलसमाधी आंदोलन केले.
पवन ऊर्जा प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणाच्या गुन्ह्यातील आत्मसमर्पण केलेला वाल्मिक कराड याला केज न्यायालयानं 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांनी दिनांक 9 डिसेंबर रोजी अपहरण करून अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. या प्रकरणाशी वाल्मिक कराडचा थेट संबंध असल्याचा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आरोप केला. 29 नोव्हेंबर 2024 रोजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडनं पवनउर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याकडं खंडणी मागितली होती. या प्रकरणी कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांनी 11 डिसेंबरला पोलिसात तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यासह तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
वाल्मिक कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी-सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता. पोलिसांनी कारवाईचा आवळलेला फास आणि सीआयडीकडून सुरू असलेला चौकशीचा ससेमिरा सुरू असताना त्यानं 31 डिसेंबरला पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसर्मपण केलं. सीआयडी पथकानं रात्री 10.00 वाजता केज पोलीस ठाण्यात आणले. रात्री पावणे अकरा वाजता केज येथील कनिष्ठ न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पावस्कर यांनी त्याला 14 जानेवारी 2025 पर्यंत 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.
ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन-खंडणी गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड यांना अटक झाल्यानंतर संतोष देशमुख यांचा खून केलेल्या तीन आरोपींना तात्काळ अटक करा, या मागणीसाठी आज मस्साजोग ग्रामस्थांनी आंदोलनाचं हत्यार उपसले आहे. संतोष देशमुख यांची हत्या होवून आज 22 दिवस झाले आहेत. परंतु अद्यापही मुख्य आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले (26 वर्ष) आणि कृष्णा शामराव आंधळे (27 वर्ष), सुधीर सांगळे (25 वर्ष) हे आरोपी फरार आहेत. तसेच हत्येचा मास्टर माईंड वाल्मिक कराड याच्यावरदेखील देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी ग्रामस्थांनी मागणी केली. ग्रामस्थांच्या जलसमाधी आंदोलनानंतर पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. यावर बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत म्हणाले, " 10 दिवसांच्या आत तीन आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न करणार आहे". प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन देण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतले.
हेही वाचा-