सातारा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांची आणखी पाच वर्षांनी द्विशताब्दी साजरी होणार आहे. त्यापूर्वी त्यांच्या स्मारकाचं काम पूर्ण करा. त्यासाठी प्रशासनाने तत्काळ १० एकर जमिनीचं अधिग्रहण करावं, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसंच सावित्रीबाईंच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
महिलांना स्वयंपूर्ण करण्याचं काम सरकार करेल : महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दाखवलेल्या मार्गावरून पुढे जात शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, सावित्रीबाईंचा विचार तळागाळापर्यंत रुजवून महिलांना स्वयंपूर्ण करण्याचं काम सरकार करेल. महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळाल्यानं पुढील काळात सर्वच क्षेत्रात आपल्याला निश्चितपणे महिलाराज पाहायला मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
५० लाख महिलांना लखपती दीदी करणार : मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, "केंद्र शासनाच्या लखपती दीदींसारख्या योजनेच्या माध्यमातून पुढील दोन-तीन वर्षात ५० लाख महिलांना लखपती दीदी करणार आहोत. स्त्रियांना गुलामाप्रमाणे वागणूक मिळत होती, त्या काळात समाजातील विषमता दूर करून समतेचे बीजारोपण करण्याचं कार्य फुले दांपत्यानं केलय. सावित्रीबाईंनी स्त्रियांना गुलामीतून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची ज्योत पेटवली. त्यांचं स्मारक उभारत असताना विचारांचंही स्मारक झालं पाहिजे", अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
फुले दाम्पत्याचा विरोध ब्राह्मण्यवादाला होता : फुले दांपत्याचा विरोध हा ब्राह्मण्यवादाला होता, कोणत्या जातीपातीला नव्हता, असं सांगून आमदार छगन भुजबळ म्हणाले, "फुले दांपत्याच्या जीवनातील महत्त्वाची ठिकाणे जोडण्याचे काम सरकारने त्वरीत मार्गी लावावे. तसंच सावित्रीबाईंच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार हा ३ जानेवारी रोजी नायगाव येथील कार्यक्रमातच दिला जावा. फुले दांपत्याच्या साहित्याचं पुनर्मुद्रण व्हावं".
हेही वाचा -
- मलईदार खात्याकरिता मंत्री अडून, फडणवीसांकडून विकासाचे पर्व-शिवसेना यूबीटीकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक
- लवकर पदभार स्वीकारा, पदभार न स्वीकारलेल्या मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश; मंत्री नाराज?
- 'गडचिरोलीत या अगोदर खंडण्या गोळ्या केल्या'; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर नाव न घेता हल्लाबोल