नंदुरबार : राज्यभरात मोठ्या उत्साहाने सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत केले जात आहे. नवीन वर्षात नवनवीन संकल्प केले जातात. शिवाय पहिल्याच दिवशी नातेवाईकांना शुभेच्छा पाठवल्या जातात. तर शहरातील श्रॉफ हायस्कूलमध्ये सुमारे 850 विद्यार्थ्यांनी नववर्षाचं स्वागत सूर्यनमस्कार घालून केलं. विद्यालयाकडून 16 वर्षांपासून हा प्रयोग राबवला जात आहे. योगसाधनेतून उत्तम आरोग्याचा जीवन प्रवास घडण्याचा संदेश जगभर देता यावा, म्हणून सूर्यनमस्कार घालून नुतनवर्षाचं स्वागत करण्यात आल्याचं मुख्याध्यापिक सुषमा शाह यांनी सांगितलं.
श्रॉफ हायस्कूलमध्ये अभिनव उपक्रमाचे सोळावे वर्ष : सूर्यनमस्काराने आत्मिक, मानसिक, शारीरिक सामर्थ्य प्राप्त होते. जीवनातील शेकडो आव्हानांचा सामना करण्याचे आत्मिक बळ यामुळे लाभते. याच उद्दिष्टाने सूर्यनमस्काराची सांगड घालून नूतन वर्षाचे स्वागत करण्याचा उपक्रम हायस्कूलमध्ये घेण्यात आला. सलग सोळा वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. शाळेच्या प्राणंगणात दरवर्षी विद्यार्थी न चुकता नववर्षाचं स्वागत करतात, अशी माहिती सुषमा शाह यांनी दिली.
आरोग्य समृद्धीचा दिला संदेश : 2006 साली नंदुरबार श्रॉफ हायस्कूलने हा उपक्रम सुरू केला होता. बासरीची सुमधूर धुन आणि योगाद्वारे वर्षभर आरोग्य समृद्धीचा संदेश या विद्यार्थ्यांकडून दिला गेला. एकत्रितपणे सुमारे साडेआठ हजार सूर्यनमस्कार घालून विद्यार्थ्यांनी नववर्षाचे नव चैतन्याचे स्वागत केले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल सुदृढ करण्याचा हेतूने ही संकल्पना राबवल्याची माहिती, मुख्याध्यापिक सुषमा शाह यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली.
शंभर ते साडेआठशे विद्यार्थी : श्राॅफ हायस्कूलातील मुख्याध्यापिका सुषमा शाह यांनी हा उपक्रम सुरू केला होता. दरवर्षी सूर्यनमस्कार घालणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होते. त्यामुळं शंभर विद्यार्थ्यांपासून सुरू केलेला हा उपक्रम आज साडेआठशे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. भविष्यात विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करू असं मुख्याध्यापिका सुषमा शाह यांनी सांगितलं.
हेही वाचा -