धुळे :विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमधून जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात येत आहे. शिरपूर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशमधून महाराष्ट्रात येणाऱ्या एका वाहनातून रोख रक्कम वाहतूक केली जात असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यामुळे शिरपूर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर 70 लाख रुपयांची रोकड आढळून आली. पोलिसांनी कारसह चौघांना ताब्यात घेतलं असून याबाबत पुढील चौकशी शिरपूर पोलीस करत आहेत.
कारमध्ये आढळली 70 लाख रुपयांची रक्कम :महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेवर शिरपूर तालुका पोलीस वाहनांची तपासणी करत आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे इनोव्हा कार क्रमांक एमपी 09, डिएल 8618 आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर मध्यप्रदेशातील सेंधवाकडून शिरपूरकडं संशयितरित्या भरधाव वेगानं जात होती. सदर कारमध्ये रोकड रक्कम असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली. त्याद्वारे पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात 70 लाख रुपयांची रक्कम आढळली. एवढी मोठी रक्कम कशासाठी आणि कुठं जात होती, याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. सांगवी चेकपोस्ट दरम्यान वाहनांची तपासणी सुरु असताना पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी कारसह रक्कम ताब्यात घेतली. निवडणुकीच्या दरम्यान एवढी मोठी रक्कम कारमध्ये आढळल्यानं खळबळ उडाली. या संदर्भात शिरपूर तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत. ही रक्कम कशासाठी कारमधून चालवली होती, हे लवकरच पोलीस तपासात उघडकीस येईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.