कोल्हापूर Ajit Pawar On Law And Order :राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे हे खरं आहे; मात्र कोणीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई होईल. कायदा, सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न आम्ही करू. (Crime in Maharashtra) कोठेही राजकीय हस्तक्षेप होत असेल तर पोलिसांनी त्याला बळी पडू नये. मुंबईतील घोसाळकर खुनी हल्ला प्रकरण, भाजपा आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलंय.
विरोधकांवर बदनामीचा आरोप :उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर असून गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं. यावेळी मठाधिपती गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवारांनी गावकऱ्यांचे आभार मानत उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कोल्हापूर कामाचा चौथा दौरा असल्याचं सांगितलं. राज्यात बिघडत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर त्यांनी भाष्य करत विरोधकांवर बदनामीचा आरोप केलाय.
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प :आजच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाय देशाला पुढे नेणारा नेता दिसत नाही. त्यांनी देशात अनेक विकास कामं केली. वंदे भारत ट्रेन सुरू केल्या. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. राज्य सरकार आपल्या विचाराचं आहे आणि केंद्रात पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे. यासाठी त्यांच्या विचारांचे जास्तीत जास्त खासदार आपल्याला निवडून पाठवायचे आहेत, अशा शब्दात केंद्र सरकारची आणि मोदी सरकारची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्तुती केली. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चिन्ह, नाव आणि झेंडा हे पुढे नेण्याचं ठरवलं असल्याचं सांगितलं.