नवी मुंबई : महाराष्ट्रात सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय. त्यातच आता खारघरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. खारघरच्या उत्सव चौकात एका दुचाकीस्वाराला हेल्मेटनं बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर ब्रेन हॅमरेज होऊन त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. शिवकुमार शर्मा असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
नेमकं काय घडलं? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवकुमार शर्मा (वय 45, रा. वाशी) हे काही कामानिमित्त खारघर परिसरात आले होते. बेलपाडा गावाकडून उत्सव चौकाकडं जात असताना त्यांनी आपल्या समोरील दुचाकीला ओव्हरटेक केलं. ते पुढं निघून गेले. याचाच राग दुसऱ्या दुचाकीवर असणाऱ्या दोन तरुणांना आला. त्यांनी शर्मा यांची दुचाकी रस्त्यात अडवली. त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. दोन्ही तरुणांनी मिळून शर्मा यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर हेल्मेट मारुन तिथून पळ काढला.
तक्रार दाखल केल्यानंतर मृत्यू : त्यानंतर शिवकुमार शर्मा जखमी अवस्थेत दोन्ही आरोपींविरुद्ध तक्रार दाखल करण्यालाठी खारघर पोलीस ठाण्यात गेले. तिथं त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनीही त्यांची तक्रार लिहून घेतली. मात्र, तक्रार लिहिण्याच्या अखेरच्या क्षणी शिवकुमार शर्मा बेशुद्ध झाले. पोलिसांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात नेलं. ब्रेन हॅमरेजमुळं त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
आरोपींचा शोध सुरू : याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (2 फेब्रुवारी) सकाळी घडली. मात्र, अद्यापही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळं मृताच्या नातेवाईकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. तर दोन्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
हेही वाचा -