सांगलीGambling On Election Result : लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार यावरुन बुलेट गाडीची लावलेली पैज दोघा मित्रांच्या चांगलीच अंगलट आली. पैज लावणाऱ्या दोघांवर कवठे महांकाळ पोलीस ठाण्यामध्ये जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलाणी असं गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांची नावं आहेत. पैजेत लावलेल्या दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
पैजेचा कागद सोशल मीडियावर व्हायरल :सांगलीचा खासदार कोण होणार यावरुन कवठे महांकाळ तालुक्यातील दोघा मित्रांमध्ये एकमेकांच्या गाड्यांची पैज लागली आहे. एकानं अपक्ष उमेदवार विशाल पाटील जिंकून आले तर आपली युनिकॉर्न गाडी आणि दुसऱ्यानं भाजपा उमेदवार संजयकाका पाटील निवडून आले, तर आपली बुलेट गाडी देईन, अशी पैज लावली आहे. रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलाणी असे पैज लावणाऱ्या मित्रांची नावं आहेत. तर दोघांनी लावलेली पैज कागदावर लिहून घेतली आणि या पैजेचा कागद सांगलीच्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. ज्यामध्ये विशाल पाटील निवडून आले तर रमेश संभाजी जाधव यांच्याकडून यूनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुलाणी यांना तर संजयकाका पाटील निवडून आले तर गौस मुबारक मुलाणी यांचेकडून बुलेट गाडी रमेश संभाजी जाधव यांना देण्यात येणार असल्याचं यात नमूद करण्यात आलं. तर या पैजेसाठी काही लोकांना साक्षीदार म्हणून त्यांचं नाव आणि स्वाक्षरी देखील घेण्यात आली.