बुलढाणा: जिल्ह्यातील शेगाव तालुक्याअंतर्गत कालवड, बोंडगांव, कठोरा, भोनगांव, हिंगणा वैजिनाथ आणि घुई या गावांमध्ये मागील दोन ते तीन दिवसापासून केस गळतीनं नागरिक हैराण झाले होते. धास्तावलेल्या लोकांना काय करावं ते सुचत नव्हतं. त्यातच बायका जास्त घाबरल्या होत्या. याबाबत दिनांक 6 जानेवारी रोजी प्रा.आ. केंद्र भोनगाव येथे पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर दिनांक 7 जानेवारी रोजी प्रा.आ. केंद्राच्या पथकाद्वारे सर्वेक्षण करण्यात आलं.
सबंधित गावाना भेटी : रुग्णांची वाढती संख्या बघून तालुका आरोग्य अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांना याबाबत माहिती सादर करण्यात आली होती. 8 जानेवारी रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्यासह जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी, त्वचारोग तज्ञ, आयडीएसपी टीम, तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांनी सबंधित गावाना भेट देऊन पाहणी केली असता, त्यामध्ये धक्कादाय माहिती समोर आली.
टक्कल पडणाऱ्यांची संख्या: जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात टक्कल पडणाऱ्यांची संख्या आज सकाळपर्यंत ५१ वर पोहोचली होती. यामध्ये बोंडगांव १९, कालवड १५, कठोरा ०८, भोनगांव ०४, मच्छिंद्रखेड- ०५ अशा एकूण ५१ जणांना संसर्ग झाल्याची माहिती आहे.
पाणी नमुने पुणे प्रयोग शाळेत पाठवले : मागील तीन दिवसांपासून शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये केस गळतीचे प्रकार समोर आल्यानं आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. यानंतर आरोग्य पथक गावात पोहचून काही नमुने तपासणीसाठी घेतले. यामध्ये पाण्याच्या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "बाधित गाव परिसरातील पट्टा हा खारपाण पट्ट्यात येतो, तेथे पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण जास्त आहे. सदर गांवामधील पाणी नमुने जैविक तसंच रासायनिक तपासणीसाठी दिनांक ०७/०१/२०२५ रोजी पाठविण्यात आले आहेत. त्याचा तपासणी अहवाल दिनाक ०८/०१/२०२५ ला प्राप्त झाला. सदर अहवालामध्ये नायट्रेटस ५४.०८ पीपीएम नायट्रेटस - ४८.७५ पीपीएम तसंच टी.डी.एस. २११० पीपीएम या प्रमाणे आले आहेत."
अधिष्ठाता, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, अकोला येथील सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ/फिजीशीयन/बालरोगतज्ञ/त्वचारोगतज्ञ/एम. डी. पी. एस. एम/या विशेष तज्ञांच्या पथकामार्फत सर्वेक्षण करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याबाबत संचालक, आरोग्य सेवा, मुंबई यांनी दुरध्वनीद्वारे उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला यांना सांगितलं आहे.
त्वचारोग तज्ञांनी सुचविल्यानुसार पाण्यामधील हेवीमेटल्स आरसेनिक आणि लीड याची तपासणी करण्यासाठी शेगांव तालुक्यातील विविध गावातील पाणी नमुने प्रयोगशाळेमार्फत तपासून घेण्यासाठी पुढील ५ ते ६ दिवसाचा कालावधी लागणार आहे. सदर परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत जिल्हास्तरीय, तालुका स्तरीय अधिकारी व कर्मचारी निंरंतर कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असणार आहेत.
सहा गावात सर्वेक्षण :आरोग्य विभागाचे पथक शेगाव तालुक्यातील टक्कल बाधित गावात दाखल झाले आहे. तर डॉ. प्रशांत तांगडे हे शेगाव तालुक्यात तळ ठोकून आहेत. तर शेगाव तालुक्यातील बाधित गावात युद्ध पातळीवर सर्वेक्षण करण्यात येत आहे. गावकऱ्यांची तपासणी करण्यात येत असून पाण्याचे नमुने घेण्यात येत आहेत. या सर्वेक्षणावर जिल्हा आरोग्य अधिकारी बारकाईने नजर ठेवून आहेत. शेगाव तालुक्यातील भोंगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी अट्रट हे सुद्धा त्वचारोग तज्ञ आहेत. ते बाधित गावकऱ्यांचे नमुने घेत आहेत. हे नमुने तपासणीसाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
प्राथमिक आरोग्य केंद्र जवळा बु. अंतर्गत रुग्ण
१) हिंगणा वैजिनाथ ०६