मुंबई Ujjwal Nikam On Vijay Wadettiwar : हेमंत करकरे (Hemant Karkare) यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नसून 'आरएसएस' समर्थक पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतील होती, असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलाय. मात्र, न्यायालयात याबाबत पुरावे लपण्यात आले होते. ते पुरावे लपवणारे देशद्रोही कोण, तर ते उज्ज्वल निकम आहेत. अशा देशद्रोह्याला भाजपानं तिकीट दिल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. यावरून उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिलीय.
"गोबेल्सचा प्रचार" करायचा आहे: उज्ज्वल निकम यांनी वडेट्टीवार यांचा दावा "निराधार" असल्याचं सांगून फेटाळून लावला आहे. तसंच निकम यांनी आरोप केला की, हिटलरचे सहकार आणि नाझी पक्षाचे प्रमुख प्रचारक असलेल्या जोसेफ गोबेल्सचा संदर्भ देऊन त्यांना फक्त "गोबेल्सचा प्रचार" करायचा आहे. आम्ही न्यायालयीन पुरावे सादर केले आहेत. तुम्हाला फक्त गोबेल्सचा प्रचार करायचा आहे. यामुळं माझी बदनामी होत नाही तर तुमची बदनामी होते, असं निकम म्हणाले.
पाकिस्तानने कधीच वाद घातला नाही : पुढे निकम म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांची मला पर्वा नाही. पण कसाब आणि त्याचा सहकारी अबू इस्माईलने हेमंत करकरे यांची हत्या केली, या गोष्टीवर पाकिस्तानने कधीच वाद घातला नाही. पण विरोधी पक्षनेते या संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. हल्ल्यात 166 लोक मरण पावले, पण सर्व हुतात्मे झाले याचं मला दु:ख आहे. ज्यांना संपूर्ण गोष्ट माहीत नाही, ते एका पुस्तकावर विश्वास ठेवतात आणि तुम्ही हेमंत करकरे यांचा अपमान करत आहात.