मुंबई : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवनियुक्त आमदार दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. मात्र, पवारांच्या भेटीमध्ये राजकीय विषयावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.
राजकीय विषयावर चर्चा? : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विश्वस्त या नात्यानं बैठकीला उपस्थित असल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, "शरद पवारांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. प्रचार कालावधीत शरद पवार काय बोलले हे आपण विसरुन गेलो. या बैठकीत राजकीय विषयावर काहीही चर्चा झाली नाही."
ट्रम्पेट चिन्हावरील डमी उमेदवारामुळं विजय? : विधानसभा निवडणुकीत तुमच्या मतदारसंघात ट्रम्पेट चिन्हावरील डमी उमेदवारामुळं विजय झाला का? असा सवाल त्यांना विचारला असता ते म्हणाले, "ट्रम्पेटनं काही मतं घेतली हे खरं आहे. त्याचा फायदा मलाही झाला. पण बाकीच्या मतदारसंघात निवडणुकीत ट्रम्पेटचा लाभ झाला की नाही, ते मला माहिती नाही."
राम शिंदेंच्या आरोपात तथ्य नाही : रोहित पवार यांच्या विजयासाठी अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा आरोप भाजपाचे नेते राम शिंदे यांनी केला. त्यांनी केलेल्या आरोपांवर वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. "राम शिंदे यांनी अजित पवारांवर केलेल्या आरोपांबाबत तसं काही झालं असावं, असं वाटत नाही. दोन्ही पवार एकत्र येण्याबाबत अजून तशी चर्चा, विचार समोर आलेला नाही. राम शिंदे यांच्या आरोपात तथ्य नाही," असं म्हणत त्यांनी राम शिंदे यांचे आरोप फेटाळून लावले.
वळसे पाटील निसटत्या बहुमतानं विजयी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांनी आंबेगाव मतदारसंघात सभा घेत वळसे पाटील यांना पाडण्याचं आवाहन मतदारांना केलं होतं. शरद पवारांनी वळसे पाटील यांच्या पराभवासाठी प्रयत्न केले. मात्र, वळसे पाटील निसटत्या मतानं विजयी झाले. त्यानंतर ते आज शरद पवारांच्या भेटीला आल्यानं विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, आपण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विश्वस्त या नात्यानं येथे आलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा