मुंबई - ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ब्लॉकबस्टर 'अॅनिमल' वरील त्यांच्या वादग्रस्त टीकेबद्दल स्पष्टीकरण दिलं. अख्तर यांनी 2023 बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केलेल्या 'अॅनिमल' या गुन्होगारी ड्रामा चित्रपटाच्या निर्मात्याला विकृत म्हटलं होतं. एका न्यूजवायरला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, अख्तर यांनी स्पष्ट केले की, त्यांची ही टीका चित्रपटापेक्षा प्रेक्षकांवर बोट ठेवणारी होती.
"मी 'अॅनिमल' बद्दल मत व्यक्त केले नव्हतं, मी प्रेक्षकांसाठी माझं मत व्यक्त केलं होतं, अगदी प्रामाणिकपणे! जर 10-12 लोकांनी चुकीची मूल्ये किंवा असभ्य गाणे असलेला चित्रपट बनवला तर तो मुद्दा नाही. जर 140 कोटींपैकी 15 लोक विकृत असतील किंवा चुकीची मूल्ये जपणारी असतील तर, हे ठीक आहे, त्यात काही अडचण नाही. परंतु समाज जेव्हा अशा गोष्टींचं सेलेब्रिशन करायला लागतो, त्याला सुपरहिट ठरवतो तेव्हा खरं प्रश्न तयार होतो." असं जावेद अख्तर यांनी स्पष्ट केलं.
जावेद अख्तर यांनी चित्रपटाच्या शीर्षकावरही विनोद केला आणि असं सुचवले की हे शीर्षक "स्व-स्पष्टीकरणात्मक" आहे. त्यांनी याआधी एका वादग्रस्त दृश्यावर टीका केली होती ज्यात पुरुष नायक (रणबीर कपूर) कथितपणे त्याला आवडणाऱ्या प्रेयसीला (तृप्ती दिमरी) तिची निष्ठा सिद्ध करण्यासाठी त्याचा बूट चाटण्यास सांगतो. चित्रपट पाहिला नसला तरी, जावेद अख्तर यांनी 500 कोटी रुपयांच्या बॉक्स ऑफिसवरील गल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हे धोक्याचं लक्षण असल्याचही त्यांनी पुढं म्हटलंय.
जावेद अख्तर यांचा मुलगा फरहान अख्तरचे प्रॉडक्शन हाऊसने मिर्झापूर या मालिकेची सह-निर्मिती केली आहे. या मालिकेतही खूप असभ्य सामग्री आहे, असा आरोप करत दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी जावेद अख्तरवर ढोंगीपणाचा आरोप करत जोरदार प्रतिक्रिया दिली होती.
हा वाद सिनेमॅटिक मूल्य, प्रेक्षकांची जबाबदारी आणि सामाजिक प्रभावाविषयी व्यापक वादविवाद अधोरेखित करणारा आहे, अख्तर यांनी असंही नमूद केलं की चित्रपटाचे निर्माते अशा सामग्रीचे समर्थन करणाऱ्या समाजाइतके चिंतित नाहीत.