अमरावती - मुंबईत आज अमरावती जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्कार केला. खा. डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत महायुतीचे आमदार मुंबईत पोहोचले होते. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर उपस्थिती लावली. त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
बोंडे यांच्या नेतृत्वात आमदार मुंबईत - राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात बडनेरा विधानसभा मतदारसंघात रेकॉर्ड ब्रेक मतांनी चौथ्यांदा विजयी झालेले रवी राणा, मेळघाट विधानसभा मतदारसंघात एक लाखाच्या मताधिक्यानं निवडून आलेले केवलराम काळे, धामणगाव रेल्वे मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झालेले प्रताप अडसड या आमदारांनी आज मुंबई गाठली. त्याचबरोबर यांच्यासह अचलपूर, तिवसा विधानसभा मतदारसंघात जायंट किलर ठरलेले अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे तिवसा येथील आमदार राजेश वानखडे आणि मोर्शीे येथील नवनिर्वाचित आमदार उमेश यावलकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आज पोहोचले. या सर्वच आमदारांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार सत्कार केला.
देवेंद्र फडणवीस व्हावेत मुख्यमंत्री - अमरावती जिल्ह्यात युवा स्वाभिमान पार्टीचे आमदार रवी राणा यांच्यासह अचलपूरचे प्रवीण तायडे तिवसाचे आमदार राजेश वानखडे मेळघाटचे आमदार केवलराम काळे आणि मोर्शीचे आमदार उमेश यावलकर यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशा भावना यावेळी व्यक्त केल्या. अमरावती जिल्ह्यात केवळ दर्यापूर विधानसभा मतदारसंघ वगळता सात ठिकाणी महायुतीच्या आमदारांचा विजय झाला आहे. तसंच संपूर्ण जिल्ह्यात आता कमळ फुलले अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली.
अमरावती जिल्ह्यात महायुतीचे आमदार निवडून आल्यानं आता अनेक विकासकामांना वेग येईल अशी आशा येथील मतदारांनी बोलून दाखवली आहे.
हेही वाचा..