मुंबई - विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने सपाटून मार खाल्ल्यानंतर आता ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या विजयासाठी ईव्हीएमला जबाबदार ठरवलंय. अनेक मतदारसंघांमध्ये ईव्हीएममध्ये गडबड असल्याचे कारण पुढे करत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी निवडणुका पुन्हा घेण्याची मागणी केलीय. तर दुसरीकडे दहिसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजेश येरुणकर यांनी स्वतःला घरातली मतंही न मिळाल्याच्या कारणास्तव ईव्हीएमवर शंका उपस्थित केलीय.
95 मतदारसंघांमध्ये तफावत : 15 व्या विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात अनेक ठिकाणी मतदान आणि ईव्हीएमची मतं जुळली नाहीत. राज्यातील एकूण 288 मतदारसंघांपैकी 95 मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या दिवशी 20 नोव्हेंबरला ईव्हीएममध्ये झालेलं मतदान आणि 23 नोव्हेंबरला त्याच ईव्हीएममधून बाहेर आलेलं प्रत्यक्ष मतदान यात मोठा फरक असल्याचं दिसून आलंय. राज्यातील एकूण 76 मतदारसंघांत ईव्हीएममध्ये कमी मते आढळून आलीत. तर 19 मतदारसंघांमध्ये जास्त मते आढळून आलीत आणि 193 मतदारसंघांमध्ये मतदान आणि मतमोजणीत एकसमान मते ईव्हीएममध्ये आढळून आल्याने इथे कुठलाही फरक नव्हता. मनसेच्या उमेदवारानं प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएममधून पडलेल्या मतांमध्ये फरक असल्याचा आरोप केलाय.
कार्यकर्त्याचं नाही, पण घरातलं मतही नाही? : दहिसर विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या मनीषा चौधरी या विजयी झाल्यात, तर मनसेचे उमेदवार राजेश येरुणकरांना केवळ 2 मतं मिळाल्याचा ते दावा करीत आहेत. परंतु निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, राजेश येरुणकरांना 5456 मतं मिळाल्याची माहिती मिळतेय. याबाबत बोलताना दहिसर विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार राजेश येरुणकर यांनी तीन प्रश्न उपस्थित केले आहेत.
1) ईव्हीएम मशीनला तीन सील असतात. परंतु अनेक मशीनला एकच सील होतं. जेव्हा ही बाब निवडणूक अधिकाऱ्याला विचारण्यात आली तेव्हा ते म्हणाले की कधी कधी एकही सील असू शकतं.
2) मशीनचं चार्जिंग तपासण्यात आलं तेव्हा काही मशीनचं चार्जिंग 99 टक्के तर काहींचं 70 टक्के तर काहींच 60 टक्के होतं. इतका वेळ मशीन सुरू असल्याने चार्जिंग 99 % कसं राहू शकतं? हासुद्धा एक प्रश्न आहे.
3) मी इथला स्थानिक रहिवासी असून, माझ्या घरामध्ये मी, माझी पत्नी, माझी मुलगी आणि माझी आई अशी चार मतं आहेत. अशा परिस्थितीत मला केवळ दोनच मतं मिळाली. म्हणजे माझ्या आईने किंवा पत्नीने अथवा मुलीने मला मतदान केलं नाही हे कसं होऊ शकतं? आमच्या कार्यकर्त्यांची मतं कुठे गेली? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
61 टक्के जनतेची ईव्हीएमला पसंती : भारतात सध्या कुठल्याही निवडणुकीनंतर विरोधी पक्षाकडून ईव्हीएम मशीनबद्दल संशय व्यक्त केला जातोय. याच कारणासाठी जुलै 2024 मध्ये युगव्हर्नमेंट मिंट सीपीआर मिलेनियल सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणामध्ये काँग्रेस तसेच भाजपाच्या समर्थकांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्याचबरोबर कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेल्या लोकांची मतेही यामध्ये जाणून घेण्यात आली होती. या सर्वेक्षणामध्ये 61 टक्के लोकांनी मतदानासाठी ईव्हीएम असायला हवे. तसेच यामध्ये कुठलीही छेडछाड होत नाही, असं मत व्यक्त केलं होतं. तर 39 टक्के लोकांनी बॅलेट पेपरला पसंती देऊन ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर प्रणाली सुरू करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा-