मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तीन दिवस उलटल्यानंतर आता राजकीय पक्षांकडून बैठकांचं सत्र सुरू आहे. या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळं त्यांच्याकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीकडून पराभवाची कारणमीमांसा केली जात आहे. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) आपल्या पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदाची निवड केल्यानंतर आता शिवसेना (ठाकरे) यांनी सुद्धा आपल्या गटनेतेपदाची निवड केली आहे. शिवसेना (ठाकरे) नवर्वाचित आमदारांची बैठक मातोश्रीवर झाली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड - विधानसभा निवडणुकीत ठाकरे शिवसेनेचे 20 आमदार निवडून आले. या नवनिर्वाचित आमदारांना मुंबईत बोलवण्यात आलं. मातोश्री येथे या नवर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीत पराभवाची कारणे काय असावीत याचा विचार करण्यात आला. तसंच राजकीय प्रवासात पक्षाची पुढील रणनीती काय याबाबत खलबतं झाला. दरम्यान, या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विधिमंडळ गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली आहे. तर गेल्यावेळी प्रतोद राहिलेले सुनील प्रभू यांना पुन्हा एकदा प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आलं आहे.
शिवसेना गटनेते पदाची धुरा आदित्य ठाकरे यांच्याकडे द्यावी अशी यावेळी विनंती केली. मात्र आपण सातवेळा आमदार झाला आहात. गटनेतेपदाची जबाबदारी मोठी आहे. त्याची धुरा तुमच्याच खांद्यावर असली पाहिजे, असं सांगून उद्धव ठाकरे यांनी गटनेते पद आपल्यावर सोपवलं. - भास्कर जाधव
आदित्य ठाकरेंची सभागृह नेतेपदी निवड - या बैठकीला नवनिर्वाचित आमदारांना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. तसंच विशेष म्हणजे या आमदारांकडून प्रतिज्ञापत्र सुद्धा लिहून घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत पुढील रणनीती आणि आगामी काळातील पक्षाकडून होणारी कामं याचाही आढावा घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांची सभागृह नेता म्हणून निवड करण्यात आली आहे. या सर्व निवडी सर्व आमदारांच्या सहमतीने करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली.
तुम्ही पुरून उराल - बैठकीत उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित आमदार यांना मार्गदर्शन करताना त्यांचे मनोबल वाढवले. शिवसेनेच्या स्थापनेनंतर सुरुवातीला वामनराव महाडिक हे एकमेव आमदार होते. परंतु सामान्यांचे प्रश्न रोखठोक पद्धतीनं सभागृहात मांडायचे. तोच आत्मविश्वास आणि त्याच पूर्वीच्या शिवसेनेसारखे तुम्ही राहा. समोर कोणी आले तरी घाबरू नका. समोर देवेंद्र फडणवीस आले तरी त्यांना पुरून उरा. असा कानमंत्र उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित आमदारांना दिला. यावेळी आमदारांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. दरम्यान, नवनिर्वाचित आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा..