मुंबई BJP MLA Firing :कल्याणचेभाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उल्हासनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विजय वडेट्टीवारांचा सवाल : सत्ताधारी पक्षांतील दोन नेत्यांमध्ये झालेल्या या घटनेवरून आता विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 'X' वर पोस्ट करत घटनेची निंदा केली. "इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा?", असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. "गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात. कायदा आणि सुव्यस्थेचे इतके धिंडवडे निघालेला आपला महाराष्ट्र कधी नव्हता", अशी शब्दांत त्यांनी टीका केली.
यांचे बॉस 'सागर' आणि 'वर्षा' बंगल्यावर : "सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचं नाव घेत नाही. भाजपावाल्यांचे बॉस 'सागर' बंगल्यावर आणि शिंदे गटाचे 'बॉस' वर्षा बंगल्यावर बसून आहेत. त्यामुळे राज्यातील पोलीस आणि कायदा आपण धाब्यावर बसवून हा माज नाचवू शकतो हा आत्मविश्वासच दोन्ही पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आलेला आहे", असा हल्लाबोल विजय वडेट्टीवारांनी केला.
ठाकरे गटाची टीका : झालेल्या घटनेवर शिवसेना ठाकरे गटानंही प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना या घटनेची दखल घेण्याची मागणी केली. "महाराष्ट्रात चाललंय तरी काय? भाजपा आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार केला. ज्याला गोळी लागली तो मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आहे. या लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही हे आपण समजायचं का? राज्य सरकारची दोन्ही इंजिनं निकामी झाली आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याची दखल घ्यावी", असं आनंद दुबे म्हणाले.