मुंबई Sanjay Raut : ऑक्टोबर महिन्यामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापत आहे. महायुती असेल किंवा महाविकास आघाडी दोन्ही बाजूने विधानसभा निवडणुकीची तयारी जोमात सुरू आहे. अशातच महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा नक्कीच कोणाचा असेल यावर अद्याप चर्चा सुरू असताना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मात्र, हा चेहरा उद्धव ठाकरे यांचाच असेल, असं म्हटलय. त्यावर उद्धव ठाकरे यांचा चेहरा शरद पवार, नाना पटोले यांना मान्य आहे का? असा थेट प्रश्न भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे. ते मुंबईत बोलत होते.
महायुतीचा चेहरा लवकरच : येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्यातील राजकीय वातावरण सध्या विविध कारणामुळे ढवळून निघालं आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत भाजपाचा झालेला दारुण पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. अशात आता विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार यावरून दावे सुरू आहेत. महायुतीकडून अद्याप याबाबत घोषणा झाली नसली तरी, महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांचं नाव समोर आलं आहे. उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांना प्रमोट केलं आहे. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार त्याचप्रमाणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना २४ तासाची मुदत देत मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे हे त्यांना मान्य आहेत का? याचं स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी केली आहे.