महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोवऱ्या विक्रीतून अमोल खुळे कमवतोय बक्कळ पैसा, बँकेच्या जनरल मॅनेजरची नोकरी सोडून उभारला उद्योग - Business Success Story

Amol Khule Business Success : उच्चशिक्षित तरुणाने नोकरीच्या पाठीमागे न लागता गाईच्या शेणातून शाश्वत उत्पन्नाचा स्रोत शोधला आहे. दररोज निघणाऱ्या शेणापासून गोवऱ्या तयार करून त्याच्या विक्रीतून बक्कळ कमाई करत आहे. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील अमोल रावसाहेब खुळे या उच्चशिक्षित तरुणाची ही प्रेरणादायी कहाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे.

Amol Khule Business Success
गोवऱ्या विक्री

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 7:37 PM IST

Updated : Apr 1, 2024, 11:00 PM IST

गोवऱ्या विक्रीतून अमोल खुळे कमवतोय बक्कळ पैसा

अहमदनगरAmol Khule Business Success: संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील अमोल खुळे हा उच्चशिक्षित तरुण कुटुंबासमवेत शेती आणि दूध व्यवसाय करत आहे. उच्चशिक्षित असलेला अमोल एका खासगी पतसंस्था बँकमध्ये जनरल मॅनेजर म्हणून नोकरी करत होता. वर्षाकाठी 10 लाख रुपयांचे पॅकेज बँकेकडून अमोलला मिळत होते. मात्र, नोकरीमध्ये मन लागत नसल्याने अमोलने बँकेची नोकरी सोडून घरी असलेली वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय घेतला. घरी असलेली शेती आणि पाच गाई संभाळण्यास अमोलने सुरू केली. गाईंच्या दुधाला दर कमी मिळत असल्याने गायांच्या शेणातून उत्पन्नाचा मार्गही शोधला. गाईंच्या शेणातून गोवऱ्या बनवत पुणे, नाशिक, मुंबई येथे नेऊन विक्री करण्यास सुरू केलं. गोवऱ्यांना मागणीही चांगली येण्यास सुरुवात झाल्याने अमोलने आणखीन 70 गाई विकत घेतल्या आणि गेल्या चार वर्षांपासून त्याच्यासह संपूर्ण कुटुंब गाईंच्या शेणापासून गोवऱ्या बनवत आहे. दररोज एक हजार बाराशे गोवऱ्या थापण्याचे काम कुटुंब करते. त्यानंतर पुणे, मुंबई येथे अमोल गोवऱ्या विकण्यासाठी घेऊन जात असतात. एक गोवरी दहा ते बारा रुपयांना विकली जात असल्याचं अमोल खुळे यांनं सांगितलं.

चार वर्षांपासून गोवर्‍या विक्रीचा व्यवसाय :अमोलच्या घरी जवळपास सत्तर गाई असून त्यांचे दररोज चारशे लिटर दूध निघत आहे. त्यामुळे दूधाचेही चांगले पैसे होत आहेत. तर सर्व गायांच्या शेणातून गोवऱ्या बनवल्या जात आहेत. यासाठी संपूर्ण कुटुंब काम करत आहे. हिंदू परंपरेत अनेक विधींसाठी गोवऱ्यांचा वापर केला जातो. त्यामुळे गोवऱ्यांना नेहमीच मागणी असते. म्हणून गोवऱ्या बनवल्यानंतर अमोल हा स्वतः त्यांची विक्री करत आहे. गेल्या चार वर्षांपासून हा गोवर्‍या विक्रीचा व्यवसाय तो करत आहे. यातून पैसेही चांगले मिळत आहेत. त्यामुळे नोकरीच्या पाठीमागे धावणाऱ्या आजच्या तरुणांसाठी अमोल खुळे या तरुणाची प्रेरणादायी कहाणी आहे.

30 ते 35 लाखांचा नफा :टाकाऊपासून काही तरी बनवले पाहिजे म्हणून गायांच्या शेणातून यशाचा मार्ग शोधला आणि गोवऱ्या बनवण्यास सुरूवात केली. त्यामुळे आज हा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता काही तरी व्यवसाय करणे गरजेचे आहे. कारण यातूनच यशाचा मार्ग मिळत असतो असं अमोल खुळे म्हणाला. प्रथम शेण एकत्र करून त्यात पाणी टाकायचं आणि त्यानंतर शेण संपूर्ण मळून घेतल्यानंतर शेणाचा गोळा करून गोवऱ्या थापल्या जात आहेत. विशेष बाब म्हणजे, दरवर्षी थंडीतच गोवऱ्या बनवल्या जात आहेत. त्यामुळे गोवऱ्याही चांगल्या होत आहे. चार महिन्यात आम्ही जवळपास दोन लाख गोवऱ्या थापतो. घरी असलेल्या 70 गाईंचे दररोज चारशे लिटर दूध आणि या गायांचे गोमूत्र धरून 50 रुपये लिटर दराने विक्री करत आहे. त्याचबरोबर शेणापासून गोवऱ्या तयार करून विक्री करत आहे. वर्षाकाठी सगळा खर्च वजा करून 30 ते 35 लाख रुपये निव्वळ नफा मिळत असल्याचं अमोल खुळेंनी सांगितलं.

काय म्हणाली अमोलची पत्नी :शेतकरी नवरा नको गं बाई म्हणून अमोल बरोबर लग्न केलं. त्यावेळी अमोल बँकमध्ये नोकरी करत होता. मात्र तो सकाळी नोकरीवर जायचा आणि रात्री उशिरा घरी येत असे. यामुळे तो घरी वेळ देऊ शकत नव्हता. अमोल आणि मी ठरवले की आता घरची शेती करू. जे मिळेल त्यात समाधानी राहू. यानंतर अमोलने बँकेची नोकरी सोडून शेती करण्यास सुरुवात केली आणि आज मितीला आम्ही सगळे मिळून वर्षाकाठी चांगले पैसे कमवत असल्याचं समाधान अमोलची पत्नी मिलनने व्यक्त केलं आहे. मी ही उच्चशिक्षित असून मलाही वाटत होतं की शेतकरी नवरा नको गं बाई म्हणून; मात्र आता मला शेतकरीच नवरा बरा गं बाई असं वाटतं. ज्या मुली आता शेतकरी नवरा नको म्हणतात त्या मुलींनी देखील शेतकरी मुलाशी लग्न करून नवरा बायकोने व्यवस्थित शेती केली तर नोकरीपेक्षा जास्त पैसा शेतीतून कमवू शकतो असाही सल्ला मिलन खुळे हिने दिला आहे.

हेही वाचा :

  1. एप्रिल फुल डे' का साजरा होतो '? वाचा या मागचा रंजक इतिहास - april fool day
  2. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांच्या कारवाईत मोठा खुलासा, लोकसभा निवडणुकीत नक्षलवादी हिंसाचाराची होती योजना - Naxalite camp in Maharashtra
  3. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात दिलासा; व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात - Commercial Cylinders
Last Updated : Apr 1, 2024, 11:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details