कोल्हापूर: पर्यावरण प्रेमी असलेल्या रघुनाथ चौगुले यांनी 20 वर्षांपूर्वी 'एक झाड एक कुटुंब' ब्रीदवाक्य समोर ठेवून फळांच्या झाडांची लागवड केली. विशेष म्हणजे ही वडिलोपार्जित पडलेली जमीन, शेती पिकवण्यासाठी पाण्याचा स्त्रोत नसल्यानं फोंड्या माळावर ही लागवड केली. कोल्हापूरच्या पन्हाळगडाला लागून असलेल्या माले या छोट्याशा गावात 'आठवण मातीची' हे कृषी पर्यटन केंद्र आकाराला आलं. अल्पावधीतच शेतकऱ्याच्या पोरांनी उभारलेल्या या कृषी पर्यटन केंद्राची महती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पसरली.
- ऐन कोरोना काळात फळांच्या झाडांची बागेच्या जागी 'तारांकित कृषी पर्यटन केंद्र' करण्याचा पाच भावंडांनी संकल्प केला. आता विदेशातूनही या कृषी पर्यटन केंद्राला भेट देण्यासाठी रोज हजारो पर्यटक या ठिकाणी येतात. येथे येऊन ग्रामीण जीवन आणि आहार संस्कृतीचा अनुभव घेत आहेत.
गावाला आहे ऐतिहासिक महत्त्व-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांची अखेरची भेट झालेल्या पन्हाळगडाजवळील 'माले' या गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. गावाच्या पश्चिमेला गावाच्या रक्षणासाठी उभा असलेला पन्हाळगड जणू पाठीराखा म्हणून उभा असल्याचा भास व्हावा, असे हे गाव आहे. ऐतिहासिक पन्हाळगडाच्या कुशीत वसलेलं 'माले' गाव वारणा खोऱ्यातील समृद्ध गाव म्हणून पन्हाळा तालुक्यात प्रसिद्ध आहे. याच गावात रघुनाथ चौगुले यांनी आधुनिक शेती करण्याचा ध्यास मनी बाळगून स्वतःच्या 12 एकर बागायती शेतीतील सहा एकर शेतीवर वृक्ष लागवड केली. प्रसंगी खांद्यावर कावड घेऊन जवळच्या ओढ्यातील पाणी आणून उन्हाळ्याच्या दिवसात त्यांच्या पाच मुलांनी ही झाड सुमारे 200 झाडे जगवली.
ग्रामीण संस्कृतीशी जोडणारे कृषी पर्यटन केंद्र-2019 सालामध्ये जग आणि देशभरात कोरोनानं थैमान घातलं होतं. यावेळी चौगुले कुटुंबांनं याच फळांच्या बागेत इको फ्रेंडली झोपडी वजा घर बनवून याच ठिकाणी राहायचा निर्णय घेतला. याचवेळी या भावंडांच्या संकल्पनेतून आणि रमाकांत आणि शशिकांत यांचे दाजी राम भोसले आणि कृष्णात भोसले यांच्या सहकार्यानं 'आठवण मातीची' कृषी पर्यटन केंद्राची मुहूर्तमेढ रोवली गेली. सोबतीला असलेली आंबा, चिकू, पेरू या फळांची झाड आणि कडुनिंब, दालचिनी, कोरफड अडुळसा या औषधी वनस्पतींचा समावेश असलेलं आणि ग्रामीण संस्कृतीशी जोडणारे कृषी पर्यटन केंद्र आकाराला आलं.