पुणे Devendra Fadnavis Song : प्रभू श्रीरामावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणं लिहिलंय. ते गाणं संगीतकार अजय- अतुल यांनी संगीतबद्ध केलं आहे. त्यामध्ये मीसुद्धा गायण केलं आहे आणि ही गोष्ट आपल्याला पहिल्यांदाच सांगत आहे, असं म्हणत, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी माध्यमांसमोर ही नवी माहिती दिली आहे. तसंच, हे गाणं लवकरच प्रदर्शित होत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यात 'नमो वॉकॅथॉन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
देशाचे वातावरण राममय : आज भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या वतीनं 'नमो वॉकॅथॉन'चं आयोजन करण्यात आलं या गोष्टीचा खूपच आनंद आहे. एक वेगळी स्फूर्ती आणि उत्साहानं या नमो वॉकॅथॉनची सुरुवात झाली आहे. यात मोठ्या प्रमाणावर महिलांनीही भाग घेतला ही खास गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली. तसंच, त्या उद्याच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरही बोलल्या. भारतात दिवाळीसारखा सण साजरा होणार आहे. प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होणार आहेत, ही एक सुखद बाब असल्याचं त्या म्हणाल्या. त्याबरोबरच, उद्धव ठाकरे यांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण असूनही, ते जाणार नाहीत असं विचारलं असता, त्यांनी उत्तर देणं टाळलं.
फडणवीसांनी केला होता दावा : काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आपण कारसेवक असल्याचा आपल्याला अभिमान आहे, असं म्हटलं होतं. तसंच, बाबरीचा ढाचा पाडण्याचं काम चालू असताना काही लोक घरात बसले होते. त्यांना काय माहित कोण खरं आणि कोण खोट? असं म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर ठाकरे गटानंही त्यांचं वय नेमकं किती आहे? असा पलटवार केला होता. त्यामुळं अनेक दिवसांपासून कोण कारसेवक? कोण बाबरी पाडण्यासाठी गेलं? कोण नाही गेलं या विषयावर वाकयुद्ध सुरू होतं.