मुंबई Baba Siddique Shot Dead : राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री उशिरा मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात नेलं असता त्यांचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी ते त्यांचा मुलगा आणि आमदार जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर दसरा साजरा करत होते. महाराष्ट्रातील बड्या नेत्यांमध्ये बाबा सिद्दीकीच्या नावाचा समावेश असून त्यांचं राजकारणी तसंच सेलिब्रिटींशी चांगले संबंध होते. त्यामुळं त्यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच बॉलिवूडमधील अनेक कलाकार लीलावती रुग्णालयात पोहोचले. तर भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगही त्यांच्या हत्येनं हादरला आहे. या घटनेबद्दल त्यानं निषेध व्यक्त करत त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली.
काय म्हणाला युवराज सिंग? : बाबा सिद्दीकी यांच्या निधनाची माहिती युवराज सिंगला समजताच त्यानं रात्री 2 वाजता सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त केला. युवराज सिंगनं लिहिलं की, 'बाबा सिद्दीकी यांच्या अकाली निधनानं मला धक्का बसला आहे. जनतेसाठी कष्ट करणारे ते खरे नेते होते, त्यांचा प्रामाणिकपणा आणि लोकांवरील प्रेम सदैव स्मरणात राहील. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांप्रती माझी संवेदना आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.'