नवी दिल्ली Agni Chopra : भारतीय क्रिकेट संघाचे स्टार फलंदाज सध्या खराब फॉर्मशी झगडत आहेत. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांनी बरीच निराशा केली आहे. या सगळ्यात एक युवा फलंदाज रणजी ट्रॉफीमध्ये कहर करत आहे. या फलंदाजाला रोखणं हे प्रत्येक गोलंदाजासाठी मोठं टेन्शन बनलं आहे. या खेळाडूनं रणजी ट्रॉफीमध्ये सलग दुसरं द्विशतक झळकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या खेळाडूनं चालू हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये आतापर्यंत एक शतक आणि दोन द्विशतकं झळकावली आहेत.
रणजी ट्रॉफीमध्ये झळकावलं सलग दुसरं द्विशतक : रणजी ट्रॉफी 2024-25 मध्ये मिझोरामकडून खेळणारा युवा फलंदाज अग्नी चोप्रा भारतीय क्रिकेटचा नवा तारा बनला आहे. अग्नि चोप्रानं या वर्षाच्या सुरुवातीला प्रथम श्रेणीत पदार्पण केलं. आपल्या छोट्या कारकिर्दीत त्यानं आपला मोठा ठसा उमटवला आहे. मिझोरामचा संघ सध्या रणजी ट्रॉफीमध्ये मणिपूरविरुद्ध खेळत आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात अग्नी चोप्राच्या बॅटमधून शानदार द्विशतक झळकलं. अग्नि चोप्रानं 269 चेंडूत 218 धावांची वादळी खेळी खेळली, ज्यात 29 चौकार आणि 1 षटकार होता.
आधीच्या सामन्यातही झळकावलं द्विशतक :याआधी अग्नी चोप्रानं अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यातही दमदार कामगिरी दाखवली होती. त्या सामन्याच्या पहिल्या डावात अग्नि चोप्रानं 110 धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या डावात 238 धावा करुन तो नाबाद राहिला. याशिवाय रणजी ट्रॉफी 2024-25 च्या सलामीच्या सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावले. म्हणजेच अग्नि चोप्रानं यावेळी प्रत्येक सामन्यात मोठी खेळी केली आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सध्या आघाडीवर आहे.
अग्नि चोप्रा हा बॉलीवूडच्या दिग्गज निर्मात्याचा मुलगा :अग्नी चोप्रा हा बॉलिवूडचे दिग्गज निर्माता आणि दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा मुलगा आहे. विधू विनोद चोप्रा हे बॉलिवूडमधील एक मोठं नाव आहे. त्यांनी 3 इडियट्स, 12th फेल सारख्या प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता त्यांचा मुलगा क्रिकेटच्या जगात नाव कमावण्याच्या तयारीत आहे. अग्नि चोप्रानं केवळ 9 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 8 वेळा 100+ धावा केल्या आहेत, याशिवाय त्याच्या नावावर 4 अर्धशतकं आहेत. त्यानं लिस्ट ए आणि T20 क्रिकेटमध्ये 3 अर्धशतकंही केली आहेत. अग्नि मुंबईकडून ज्युनियर क्रिकेटही खेळला आहे.
हेही वाचा :
- 1188 दिवसांनी वनडेत केलं पुनरागमन; संघाला 19 वर्षांनंतर मिळवून दिला ऐतिहासिक विजय
- IPL 2025 लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सच्या दिग्गज खेळाडूचे वडील राजकारणात; खेळाडू एका वर्षापासून भारतीय संघाबाहेर