मुंबई IPL 2025 Mega Auction Dates : अलीकडेच, सर्व फ्रँचायझींनी IPL 2025 संदर्भात त्यांच्या संबंधित रिटेन केलेल्या खेळाडूंच्या याद्या जाहीर केल्या होत्या. यात अनेक दिग्गज खेळाडूंना संघांनी बाहेरचा रस्ता दाखवला. यामध्ये ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि केएल राहुलसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. कर्णधार असूनही फ्रँचायझीनं या तीन खेळाडूंना सोडण्याचा निर्णय घेतला. या खेळाडूंना रिटेन केल्यानंतर आता लिलावाची तारीख आणि ठिकाण याबाबत क्रिकेट चाहत्यांच्या मनात प्रश्न घुमत आहेत. आता या संदर्भात मोठा खुलासा झाला आहे.
कुठं होणार लिलाव : खरं तर, IPL 2025 च्या लिलावासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. IPL 2025 मेगा लिलावाचं ठिकाण आणि तारखेबाबत मोठा खुलासा झाला आहे. या महिन्याच्या अखेरीस आयपीएल 2025 मेगा लिलाव होण्याची शक्यता आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये हा मेगा लिलाव होण्याची शक्यता आहे. एएनआयनं आपल्या एका रिपोर्टमध्ये हा मोठा खुलासा केला आहे.
आयपीएल लिलावाची तारीख ठरली :एएनआयनच्या अहवालानुसार IPL 2025 चा मेगा लिलाव 24 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान रियाधमध्ये होऊ शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून या महिन्याच्या अखेरीस मध्यपूर्वेतील एका मोठ्या शहरात मेगा लिलाव होण्याची शक्यता वर्तवली जात होती, जी आता जवळपास निश्चित मानली जात आहे. सर्व संघ IPL लिलावाची आतुरतेनं वाट पाहत आहेत कारण यावेळी लिलावात एकापेक्षा एक खेळाडू आपलं नशीब आजमावताना दिसणार आहेत. अशा स्थितीत लिलावात संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होऊ शकते.
4 शहरं नाकारली :BCCI नं यापूर्वी लंडन, दुबई, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियातील एका शहराचा IPL 2025 च्या मेगा लिलावासाठी ठिकाण म्हणून विचार केला होता. मात्र, आता या चार शहरांना यादीतून वगळण्यात आले आहे. क्रिकबझच्या मते, लंडनला हवामानामुळं यादीतून काढून टाकण्यात आले. तर टाइम झोनमधील प्रचंड फरकामुळं ऑस्ट्रेलियाला वगळण्यात आलं आहे. वास्तविक, BCCI ला भारतीय वेळेनुसार दुपारी लिलावाची वेळ ठेवायची आहे. पण ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या वेळेत बराच फरक आहे. याशिवाय ब्रॉडकास्टर्सचीही यात मोठी अडचण झाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. याच दरम्यान BCCI ला एक मेगा लिलाव करायचा होता आणि दोघांचा ब्रॉडकास्टिंग पार्टनर डिस्ने स्टार आहे. IPL चा शेवटचा लिलाव दुबईत पार पडला. यावेळी बोर्डाला इथं मेगा लिलाव करायचा नाही.
IPL 2025 लिलावापूर्वी रिटेन केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी :
- चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, मथिशा पाथिराना, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी
- दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल
- गुजरात टायटन्स : राशिद खान, शुभमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान
- कोलकाता नाइट रायडर्स : रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग,
- लखनऊ सुपर जायंट्स : निकोलस पुरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसीन खान, आयुष बदौनी
- मुंबई इंडियन्स : जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा
- राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, संदीप शर्मा
- सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड
- पंजाब किंग्स : शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : विराट कोहली, रजत पाटीदार, यश दयाल.
हेही वाचा :
- क्रिकेटमध्ये रोहित-विराट युग संपलं...? आकडेवारी पाहा अन् तुम्हीच ठरवा
- न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला रामराम, मुंबईत खेळला अंतिम सामना; म्हणाला 'क्रिकेटमधील एका सुंदर...'