कोल्हापूर : प्रेमाला ना जात असते ना धर्म, मानवी मनाच्या संवेदना एकमेकाप्रती व्यक्त झाल्या की, प्रेमाचा अंकुर बहरत जातो. एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटतो. यातूनच मानवी हृदयाचा विकास साधला जातो आणि प्रेमाची कबुली दिली जाते. प्राथमिक शिक्षणापासून एकाच शाळेत असलेले नंतर शाहिरी संगीताचे धडे गिरवताना एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले कोल्हापूरचे शाहीर विशारद आझाद नायकवडी आणि शाहीर अलंकार मनीषा यांच्या प्रेमाचीही गोष्ट अशीच आहे. महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण घेताना दोघांनाही शाहीरी संगीतानं एकत्र जोडलं. डॉ. मनीषा यांनी लग्नानंतर शाहीर आझाद यांची विशारद पदवी पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला, "यामुळं मला आधुनिक सावित्री मिळाली" अशा भावना व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं आझाद यांनी व्यक्त केली. तर, माझं पहिलं व्हॅलेंटाईन शाहीर आझादचं असल्याची कबुली शाहीर अलंकार डॉ. मनीषा नायकवडी यांनी दिली. पाहुयात शाहिरीला अखंड वाहिलेल्या आझाद आणि मनीषा यांच्या प्रेमाची गोष्ट.
मैत्रीच रुपांतर प्रेमात कधी झालं समजलं नाही : करवीर संस्थान अधिपती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात कलेला राजाश्रय दिला. अनेक कलाकार या कोल्हापूर नगरीतून नावारुपास आले. 'शाहीर महाराष्ट्राचा प्राण' अशा पद्धतीनं या शाहिरांना मानाचं पान राजदरबारात असायचं. कोल्हापूरच्या राजघराण्यात १९९२ पासून दरबारी शाहीर म्हणून सेवा करत असलेले आझाद नायकवडी यांना वयाच्या चौथ्या वर्षापासूनच वडील शाहीर पापालाल नायकवडी यांच्याकडून शाहिरीचे धडे मिळाले. शाहिरी आणि संगीत विषयात आवड असल्यानं याच विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवत आझाद नायकवडी यांनी शाहीर आत्माराम पाटील यांच्या रचनांचा शाहिरी अभ्यास या विषयात पीएचडी संपादन केली. दरम्यानच्या काळात मनीषा यांनीही संगीत विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. बालपणी वर्गशिक्षिकेची मुलगी असलेल्या मनीषा आणि आझाद यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं दोघांनाही समजलं नाही. मात्र, दोघांना एकत्र बांधणारा संगीत हा धागा मनमुराद जपण्यात दोघांनाही यश मिळालं आणि २००५ यावर्षी आंतरधर्मीय विवाह करून पुरोगामी कोल्हापुरातून राजर्षी शाहूंचा विचार जपण्याचं काम शाहीर आणि संगीत क्षेत्राला वाहून घेतलेल्या मनीषा आणि आझाद नायकवाडी यांनी केलं. तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी पुढाकार घेऊन या आंतरधर्मीय विवाहाला समाज मान्यता मिळवून दिली.
शाहीर आझाद यांच्यासाठी मनीषा बनल्या आधुनिक सावित्री : संगीत विषयात संशोधन करून आझाद नायकवडी यांनी डॉक्टरेट मिळवली. याच विषयातील शाहीर विशारद पदवी संपादन करण्यासाठी पत्नी मनीषा आपल्या मागं खंबीर उभ्या राहिल्या. त्यांनीच पुढाकार घेत डॉक्टर आझाद यांच्या विशारद पदवीसाठी अभ्यासापासून ते संशोधन पेपर तयार करण्यात सिंहाचा वाटा उचलला. यामुळं नायकवडी शाहीर विशारद आझाद नायकवडी म्हणून प्रसिद्ध झाले. याचं सगळं श्रेय डॉ. आझाद आपली पत्नी शाहीर अलंकार डॉ. मनीषा नायकवडी यांना देतात.
शाहीर दांम्पत्याने अवघा महाराष्ट्र पिंजून काढला : डफावर थाप देत प्रबोधनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचा विचार महाराष्ट्रासह देशात पोहोचावा यासाठी शाहिरीच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षात सुमारे ३ हजाराहून अधिक शाहिरी पोवाड्याचे कार्यक्रम करून प्रबोधन करण्याचं काम शाहीर विशारद डॉ. आजाद नायकवडी आणि त्यांच्या पत्नी डॉ. मनीषा नायकवडी यांनी केलं आहे. भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासमोर दोनवेळा आणि प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद यांच्यासमोर शाहिरी कला सादर करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. पुण्यातील राजर्षी शाहू महाराज पुतळा अनावरण कार्यक्रम, रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन सोहळा, दिल्लीतील शिवजयंती निमित्तानं डॉ. आझाद नायकवडी यांना शाहिरी कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. राष्ट्रपतींसमोर लोककलेचं सादरीकरण करणारे महाराष्ट्रातील ते एकमेव शाहीर आहेत.
प्रेम विवाहाला घरातून झाला होता विरोध : आझाद आणि मनीषा यांच्या प्रेमाची गोष्ट मनीषा यांच्या घरी समजल्यानंतर जातीच्या भिंती आड आल्या होत्या. मात्र, या भिंतींना छेद देत दोघांनीही रजिस्टर पद्धतीनं लग्न केलं. यावेळी तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी नायकवडी यांना पुरोगामी विचार जपणारा शाहीर म्हणून मोलाची साथ दिली होती. विवाहनंतर त्यांचा विरोध मावळला. आता, दोन्ही कुटुंबं सुखा समाधानानं नांदत आहेत. याचं सारं श्रेय नायकवडी कुटुंब राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराला देतात.
अख्या कुटुंबानं केला देहदान करण्याचा निश्चय : प्रबोधनातून शाहिरी अंगा-अंगात भिनलेल्या शाहीर पापालाल नायकवडी, शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी, शाहीर अलंकार डॉ. मनीषा नायकवडी यांनी मरणोत्तर देहदान करण्याचा निश्चय केला आहे. शाहिरी लोककला रक्तात भिनलेल्या कुटुंबाच्या समाजसेवा आणि कोल्हापूरच्या राजघराण्यावरील श्रद्धेमुळंच ७ जानेवारी २०१७ रोजी श्रीमंत शाहू महाराजांनी डॉ. आझाद नायकवडी यांना 'शाहीर विशारद' हा मानाचा पुरस्कार बहाल केला आहे.
जोडीचं आजरामर प्रेम : जातीपातीच्या भिंती तोडत पुरोगामी कोल्हापुरातून डॉ. आझाद नायकवडी आणि डॉ. मनीषा नायकवडी यांनी गुंफलेला प्रेमाचा धागा आणि त्याला मिळालेली संगीताची साथ यामुळंच या जोडीचं आजरामर प्रेम नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरते. तर, प्रबोधनाच्या माध्यमातून लोककलेचा केलेला प्रसार आणि नव्या पिढीला विशेषता मुलींना मिळत असलेले शाहिरीचे धडे छत्रपती ताराराणींचा पराक्रमी इतिहास पोहोचवण्याचं काम प्रबोधन शाहिरीच्या माध्यमातून होत आहे. कोल्हापुरातील उषाराजे हायस्कूल इथं डॉ. आझाद नायकवडी संगीत विभागाचे प्रमुख आहेत. तर, डॉ. मनीषा नायकवडी न्यू कॉलेज इथं सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
हेही वाचा :