मुंबई - विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्या भूमिका असलेला लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शत 'छावा' चित्रपट उद्या १४ फेब्रुवारी २०२५ रोजी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मराठा योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट गेल्या काही दिवसापासून खूप चर्चेत आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे 'छावा' ला जबरदस्त ओपनिंग मिळेल असं भाकित केलं जात आहे. आतापर्यंत 'छावा'च्या अॅडव्हान्स बुकिंगला कसा प्रतिसाद मिळाला यावर एक नजर टाकूयात.
'छावा'च्या कमाईचा बॉक्स ऑफिसवरील अंदाज - सॅकॅनिल्कच्या मतानुसार, 'छावा' नं ब्लॉक सीट्ससह प्री-सेल्समध्ये आधीच १२.४३ कोटी रुपये कमावलं आहेत. या चित्रपटानं हिंदीमध्ये ९.६६ कोटींची कमाई केली आहे, तर तामिळनाडू, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रिलीजपूर्वी इतक्या पैशांच्या तिकिटांची विक्री झाल्यामुळे चित्रपटाला बंपर ओपनिंग मिळण्याची शक्यता दिसून येते. तिकिटांबद्दल बोलायचे झाले तर, 'छावा'ची आतापर्यंत ३३,९००१ तिकिटं हिंदीमध्ये विकली गेली आहेत. निर्मात्यांनी जगभरात विकल्या गेलेल्या तिकिटांची संख्या शेअर केली आहे. ही संख्या ५ लाख इतकी आहे.
फिल्म ट्रेड अॅनालिस्ट काय म्हणतात? - ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी 'छावा' चित्रपटाची ओपनिंग चांगली होईल असा अंदाज वर्तवला आहे. त्यांनी असा अंदाज केलाय की, हा चित्रपट २५-३० कोटी रुपयांच्या दरम्यान कमाई करेल. जर पहिल्या दिवशी एवढी कमाई झाली तर विकी कौशलसाठी ही सर्वात मोठी सोलो ओपनिंग असेल. याआधी, विकी कौशलचे मागील चित्रपट 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक', 'सॅम बहादूर' आणि 'जरा हटके जरा बच के' यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. प्रेक्षक 'छावा' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
'छावा' २०२५ चा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरणार का? - प्रभावी प्री-सेल्स आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा लक्षात घेता, छावा हा २०२५ मध्ये हिंदी चित्रपटासाठी ओपनिंग डेचा सर्वाधिक कलेक्शन करु शकतो. चित्रपटाच्या बुकिंगला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
'छावा' बॉक्स ऑफिसवर 'कॅप्टन अमेरिका: ब्रेव्ह न्यू वर्ल्ड' या हॉलिवूड चित्रपटाला टक्कर देईल. 'कॅप्टन अमेरिका' ही आधीच एक जगप्रसिद्ध फ्रँचायझी आहे आणि ती 'छावा'शी जोरदार स्पर्धा करु शकते.
'छावा'मध्ये विकी कौशल, रश्मिका आणि अक्षय खन्ना यांच्याशिवाय डायना पेंटी, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि विनीत कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे आणि मॅडॉक फिल्म्सने निर्मिती केली आहे. त्याचा साउंडट्रॅक ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केला आहे आणि गीते इर्शाद कामिल यांनी लिहिली आहेत.
हेही वाचा -