सेंट व्हिन्सेंट WI vs BAN 3rd T20I Live Streaming : वेस्ट इंडिज क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 3 सामन्यांच्या T20I मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 20 डिसेंबर (शुक्रवार) रोजी किंग्सटाउन, सेंट व्हिन्सेंट येथील अर्नोस व्हॅले ग्राउंडवर खेळवला जाईल.
बांगलादेशची नजर क्लीन स्वीपवर : तस्किन अहमदच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेश क्रिकेट संघानं वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. यासह बांगलादेशनं पहिल्यांदाच वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांच्याच देशात मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. आता तिसरा सामना जिंकत यजमान संघाला क्लीन स्वीप करण्याचा बांगलादेशचा प्रयत्न असेल तर हा सामना जिंकत वेस्ट इंडिज संघ आपली प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करेल.
दुसऱ्या सामन्यात काय झालं : दुसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. बांगलादेशच्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली. लिटन दास आणि सौम्या सरकार ही सलामीची जोडी स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतली. लिटन दासनं 3 तर सौम्या सरकारनं 11 धावा केल्या. तनजीद हसनला 2 धावा करता आल्या. बांगलादेश संघानं 39 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. यानंतर मेहदी हसन मिराज आणि झाकेर अली यांनी क्रीझवर आपले पाय रोवण्याचा प्रयत्न केला पण ते एकमेकांना जास्त वेळ साथ देऊ शकले नाहीत. विकेट पडण्याची प्रक्रिया सुरुच होती. मात्र, शेवटी फलंदाज शमीम हुसेननं 35 धावांची नाबाद खेळी खेळून संघाला 129 धावांपर्यंत नेण्यात यश मिळवलं.
वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची निराशजनक कामगिरी : बांगलादेशच्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिज संघाची फलंदाजी खूपच कमकुवत दिसत होती. 3 फलंदाज वगळता कोणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसनं सर्वाधिक 32 धावांची खेळी खेळली. वेस्ट इंडिजचा संघ पूर्ण 20 षटकंही खेळू शकला नाही आणि 18.3 षटकांत केवळ 102 धावांत आटोपला. अशाप्रकारे वेस्ट इंडिजला मालिकेत दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 18 T20 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजनं 9 सामने जिंकले आहेत, तर बांगलादेशनं 7 सामन्यात यश मिळवले आहे. याशिवाय 2 सामने अनिर्णित राहिले. दोन्ही संघांमधील हा सामना नेहमीच रोमांचक राहिला आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश तिसरा T20 सामना कधी आणि कुठं होईल?