ठाणे Vinod Kambli Birthday : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी शनिवारी भिवंडीतील काल्हेर भागातील आकृती रुग्णालयात पत्नी व मुलांसह नियमित तपासणीसाठी आला होता. मात्र रुग्णालय प्रशासनाला त्याच्या वाढदिवस असल्याचं कळताच त्यांनी त्याच्या कुटंबासह रुग्णालयातच वाढदिवस उत्साहात साजरा केला. तसंच यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून कांबळीला गिफ्टही देण्यात आलं.
केक कापत वाढदिवस साजरा : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला विनोद कांबळीला चार दिवसांपूर्वी भिवंडीतील आकृती रुग्णालयात रुटीन तपासणीसाठी दाखल करण्यात आलं होतं. तपासणी दरम्यान त्याला अशक्त वाटत असल्यानं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आलं. सध्या त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असून, डॉक्टरांनी उपचारांवर समाधान व्यक्त केलं आहे. अशातच शनिवार 18 जानेवारी रोजी त्याच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयात एक खास समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आकृती रुग्णालयाचे संचालक शैलेश ठाकूर, रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारीवर्ग आणि विनोद कांबळी यांचे कुटुंबीय पत्नी व मुलगा आणि मुलगी आदी उपस्थित होते. रुग्णालयात केक कापून आणि पुष्पगुच्छ तसंच फोटो फ्रेम देऊन विनोद कांबळीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी पत्नी सोबतची फोटोफ्रेम पाहून विनोद कांबळी भावुक झाला आणि त्यानं रुग्णालय प्रशासन तसंच त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले.
अनेक दिवसांपासून सुरु आहेत उपचार : दरम्यान, 23 डिसेंबर रोजी भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू विनोद कांबळी यांना प्रकृती अस्वस्थतेमुळं भिवंडीतील काल्हेर येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे आकृती रुग्णालयाचे संचालक शैलेश ठाकूर हे बालपणापासून क्रिकेटचे चाहते असून त्यांनी विनोद कांबळी याचे अनेक सामने पाहिले आहेत. सोशल मीडियावर कांबळींच्या प्रकृती अस्वस्थतेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी भावनिक होत त्याला मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यानं तब्येत सुधारताच रुग्णालयात चक दे इंडिया या हिंदी गाण्यावर भन्नाट डान्स केला होता. त्याच्या उत्साही डान्सनं रुग्णालयातील कर्मचारी आणि उपस्थितांनाही प्रेरित केलं. उपचारादरम्यान सकारात्मक उर्जा ठेवत त्यानं सर्वांशी संवाद साधल्याचं या डान्स व्हिडिओमुळं समोर आलं होतं.
हेही वाचा :