पालघर : तलासरी तालुक्यातील वेवजी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संघटक अशोक धोडी यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार बारा दिवसांनी उघड झाला. खाणीत ढकलून देण्यात आलेल्या कारचा आणि त्यातील अशोक धोडी यांच्या मृतदेहाचा पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध लावला.
अशोक धोडी यांचे भाऊ अविनाश याच्यासह या प्रकरणात सात आरोपी असण्याची शक्यता असून त्यातील चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेल्या अविनाशचा पोलीस शोध घेत आहेत.
मुंबईवरून परतताना अपहरण : अशोक धोडी हे वीस जानेवारी रोजी काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. मुंबईवरून ते परत निघाले होते. मीरा-भाईंदरवरून घरी फोन करून त्यांनी आपण काही वेळातच पोहोचत असल्याचं सांगितलं. परंतु, त्यानंतर त्यांच्यासह त्यांच्या गाडीचे अपहरण करण्यात आले. सीसीटीव्ही अथवा अन्य कोणतीही व्यवस्था नसलेल्या ठिकाणाहून त्यांचे अपहरण करण्यात आल्यामुळं त्यांच्या शोधाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.
कुटुंबीयांचा सुरुवातीपासूनच अपहरणाचा संशय : २१ तारखेलाच धोडी यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार देऊन त्यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला होता; परंतु सुरुवातीला त्यातील गांभीर्य पोलिसांच्याही लक्षात आले नव्हते. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची ज्या प्रमाणात चर्चा झाली, राज्यभर हे प्रकरण गाजले, तशी या प्रकरणाची चर्चा झाली नाही. तपास लागत नसल्याने नंतर मात्र कुटुंबीय आक्रमक झाले. त्यांनी अपहरण करून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला.
"गेल्या बारा दिवसांपासून अशोक धोडी यांचा मृतदेह आणि कारचा शोध सुरू होता. त्यासाठी सहा पथके तैनात करण्यात आली होती. तांत्रिक तपासाच्या आधारे अखेर गुजरात राज्यातील भिलाड येथील सरिग्राम खाणीत त्यांचा मृतदेह आढळला आहे. आता उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करू." : बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर
"अशोक धोडी यांच्या हत्या प्रकरणातील आरोरींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल, यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे." : गणेश नाईक, पालकमंत्री
सहा पथकांकडून शोध : पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी सहा पथके नेमली. काही लोकांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले. अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे भाऊ अविनाश याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी अविनाशला ताब्यात घेतले; परंतु पोलिसाच्या ताब्यातून तो आणि आणखी एक जण फरार झाल्यामुळे पोलिसांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत होती. अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
पोलिसांवर दबाव : पोलिसांनी अविनाश धोडी, मनोज राजपूत, सुनील धोडी या तिघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. अविनाशसह एक जण पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्याने त्यांच्यावरचा संशय आणखीच बळावला. गेल्या बारा दिवसापासून अशोक धोडी यांच्याबाबत कोणतीच माहिती मिळत नसल्याने पोलिसांवरही तपासासाठी दबाव होता.
अवैध धंद्याविरोधात केल्या होत्या तक्रारी : अशोक धोडी यांनी यापूर्वी पोलिस ठाण्यात तलासरी तालुक्यातील अवैध धंद्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या. या अवैध धंद्यांना आळा घालण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यात मद्यतस्करीबाबत अधिक तक्रारी होत्या. अवैध धंद्याच्या आड अशोक धोडी येत असल्याने त्यांना या जगातून संपवण्याचा कट अविनाशसह अन्य संशयित आरोपींनी रचला होता. पूर्ववैमनस्य आणि अवैध धंद्याविरोधातील तक्रारीतून त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली.
अपहरण केल्यानंतर हत्या : अशोक धोडी यांच्या कारच्या काचा अपहरण करताना फोडण्यात आल्या. त्यांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह गाडीच्या डिकीत बांधून ठेवण्यात आला. डिकीत ठेवलेला मृतदेह कारसह गुजरात राज्यातील एका खाणीत ढकलून देण्यात आला. त्यामुळे पोलिसांसमोर या गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आव्हान होते. त्यातच एका ठिकाणी मिळालेल्या धाग्यावरून अशोक धोडी यांची कार गुजरातच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट होत होते. त्यावरून पोलिसांची पथके या भागात तपास करत होती. पोलिसांच्या हाती काही तांत्रिक धागेद्वारे लागले.
गुजरातच्या खाणीतून कार आणि मृतदेह शोधण्यात यश : अविनाश आणि त्याचा एक सहकारी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. अखेर १२ दिवसानंतर अशोक धोडी यांची कार सरिगाम या गावातील दगडाच्या खाणीत आढळून आली. ही खाण सुमारे सत्तर फूट खोल असून त्यात ४५ ते पन्नास फूट पाणी होते. तिचा शोध घेऊन कार बाहेर काढण्यात शुक्रवारचा संपूर्ण दिवस गेला. त्यानंतर अशोक धोडी यांच्या मुलाला तेथे बोलवून घेण्यात आले .अशोक यांचा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता; परंतु त्यांच्या अंगावरच्या कपड्यावरून मुलाने मृतदेह ओळखला. आता याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघांना उद्या न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अशोक धोडीच्या भावासह अन्य तीन आरोपींचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
अविनाश धोडीवर अनेक गुन्हे दाखल : दोन भावांमध्ये गेली अनेक वर्षांपासून प्रॉपर्टी व व्यवसायिक वाद होते. याआधी आरोपी अविनाश धोडी याने अशोक धोडी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला असल्याचा आरोप करण्यात आला होता. आरोपी अविनाश धोडी हा मोठा दारू माफिया असून दमन बनावट दारू महाराष्ट्रात आणून तो संपूर्ण पालघर जिल्ह्यात त्याचे जाळे असून त्याच्यावर गुजरात राज्यात 11 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. अशोक धोडी यांच्या हत्तेत त्याचा सहभाग असल्याचा संशय आहे.
हेही वाचा - जादूटोण्याच्या संशयावरून धारदार शस्त्रानं महिलेवर हल्ला; पुरावा नसतानाही आरोपीला पोलिसांनी कसं शोधून काढलं?