मुंबई : 1975 साली स्थापन करण्यात आलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष झाली आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानावर अनेक सामने खेळले गेले. यातील काही सामन्यांची तर इतिहासाला देखील नोंद घ्यावी लागली आहे. अशा या ऐतिहासिक वानखेडे मैदानाच्या 50 वर्षाच्या प्रवासाचा सोहळा सध्या मुंबईत सुरू आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशननं या सोहळ्याचं आयोजन केलं असून, या सोहळ्याला शरद पवार, राहुल नार्वेकर, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, आशिष शेलार, सुनील गावस्कर, अजिंक्य रहाणे उपस्थित होते.
सचिन तेंडुलकर काय म्हणाला? : "सुनील गावस्कर यांना पाहून मी या खेळात आलो. त्यांच्या हातात ट्रॉफी पाहिली होती. तेव्हा वाटलं होतं की, आपल्या हातात देखील अशी ट्रॉफी असावी. त्यामुळं मी क्रिकेटमध्ये आलो. माझ्या निवृत्तीच्या वेळी अशीच पाण्याची बॉटल हातात होती. आता परत याच मैदानावर हातात पाण्याची बॉटल आहे. त्यामुळं थोडा भावूक आहे. मी 10 वर्षाचा असताना पहिल्यांदा या मैदानावर आलो. त्यावेळी भारत- ऑस्ट्रेलिया सामना होता. कधी कधी उंची छोटी असण्याचा फायदा होतो. मातीत खेळण्याची सवय होती. पहिल्यांदा एवढं हिरवं मैदान पाहिलं होतं. इथं अनेक रणजी ट्रॉफी आम्ही जिंकल्या आहेत. माझ्यासाठी वानखेडे स्टेडियम नेहमीच खास आहे. 30 वर्ष माझ्या आईनं मला खेळताना पाहिलं आहे. मी इथं माझ्या आईला सामना बघायला घेऊन आलो होतो. माझ्या आईला मोठ्या स्क्रीनवर दाखवलं होतं. त्या दिवशी खेळताना थोडं प्रेशर होतं," अशी आठवण मास्टर बलास्टर सचिन तेंडुलकर यानं सांगितली.
"जेव्हा मी वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदा आलो, तेव्हा हे बॉम्बे क्रिकेट असोसिएशन होतं. आता मुंबई क्रिकेट असोसिएशन आहे. याच मैदानावर मी सिक्स मारला होता आणि त्या दिवसानं माझं आयुष्य बदललं". - रवी शास्त्री
हिटमॅन कसा घडला? : "लहानपणापासून वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट खेळायचं स्वप्न होतं. तेव्हा मी 14 वर्षाचा होतो. इथे खेळण्यात एक वेगळीच मजा आहे. एक स्वप्न होतं, मला देखील वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकून आणायची होती. 2007, 2011 या दोन्ही वर्ल्ड कपचे सेलिब्रेशन इथे झाले. त्यामुळं 2024 चं देखील असंच व्हावं अशी माझी इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. त्या दिवशी मुंबईत परेड झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी कळलं आपण मुंबईत ट्रॉफी आणून जे केलं ते योग्य होतं," अशी आठवण रोहित शर्मानं यावेळी सांगितली.
अजिंक्य रहाणे यानं लहानपणीच्या आठवणींना दिला उजाळा : "मी सुरुवातीला डोंबिवलीमधून ट्रेनने यायचो आणि जायचो. भारत- ऑस्ट्रेलिया मॅच होती, त्याचा मी रनरअप म्हणून आलो होतो. तेव्हा मी 10 ते 12 वर्षाचा होतो. या मैदानावर खूप काही शिकायला मिळालं," असं सांगत अजिंक्य रहाणे यानं लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
वानखेडे स्टेडियमचे पोस्ट तिकीट अनावरण : भारतीय डाक विभागाकडून वानखेडे स्टेडियमचे पोस्ट तिकीट अनावरण करण्यात आले. शरद पवारांच्या हस्ते या पोस्टल तिकिटाचं अनावरण करण्यात आलं. भारतीय डाक विभागाचे अधिकारी अमिताभ सिंह हे देखील यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा -