पुणे Badminton Player Tanvi Patri : नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धत भारताला 6 पदकं मिळाली असून, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला एकही सुवर्णपदक मिळालं नाही. सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या भारतात आजही अनेक खेळाडू हे ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचं स्वप्न पाहत असून, तशी तयारी या खेळाडूंकडून करण्यात येत आहे. असं असताना ओडिसा येथील 13 वर्षीय तन्वी पत्रीनं नुकत्याच झालेल्या आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या पंधरा वर्षाखाली गटाचं विजेतेपद पटकावलं आहे. यामुळं आता या 13 वर्षीय तन्वीला सर्वत्र 'ज्युनिअर पी.व्ही.सिंधू' म्हणून ओळखलं जातंय.
चीनमध्ये घतलं प्रशिक्षण : तन्वीचे आई-वडील रबीनारायण पत्री व शैलबाला पांडा हे सॉफ्टवेयर इंजिनियर आहेत. ते पूर्वी चीनमध्ये काम करत होते. तिथंच तन्वीनं बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तिनं चीनचे शीर्ष प्रशिक्षक जियांग योंग वायएल यांच्याकडं प्रशिक्षण घेतलं. कोविड-19 महामारीमुळं तिचं कुटुंब भारतात परतण्यापूर्वी 2017 ते 2020 दरम्यान तिनं चीनमध्ये नऊ विजेतेपदं जिंकली. यानंतर ती 2022 मध्ये प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमी (PPBA) मध्ये सामील झाली आणि टॅलेंट शोधण्यासाठी आयोजित केलेल्या शिबिरात अकादमीचं लक्ष वेधून घेतलं. कोरोनादरम्यान ते सर्व जण भारतात परतले. तन्वी गेली दोन वर्षे बंगळुरुच्या प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. चीनमध्ये वडील हे कामाबरोबरच बॅडमिंटन खेळत असताना तन्वीलाही बॅडमिंटनची आवड निर्माण झाली आणि वयाच्या पाचव्या वर्षापासून तिनं बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. वडिलांनाच पाहता पाहता आज तन्वीनं बॅडमिंटन स्पर्धेत वयाच्या 13 व्या वर्षीच नाव कमवायला सुरुवात केली.
अनेक स्पर्धांमध्ये जिंकली पदकं : आजपर्यंत राज्यात तसंच देशात आणि देशाबाहेर झालेल्या अनेक स्पर्धेत तन्वीनं अनेक पदकं जिंकली आहेत. ज्यात भुवनेश्वर इथं झालेल्या ऑल-ओडिशा उप-रँकिंग स्पर्धेत अंडर-15 आणि अंडर-17 मुलीच्या एकेरीत तिनं दोन्ही विजेतेपदं पटकावली, तर ज्युनियरने ओएसबीए ऑल-ओडिशा मिनी आणि सब-ज्युनियरमध्ये तीन विजेतेपदं, ऑल-ओडिशा रँकिंग स्पर्धेत अंडर-19 मुलींचं एकेरी विजेतेपद, ऑल इंडिया सब ज्युनियर रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा हैदराबाद येथील अखिल भारतीय सब ज्युनियर रॅरिकिंग स्पर्धेत अंडर-15 आणि अंडर 17 मुलींच्या एकेरीत विजेतेपद पटकावलं.