छत्रपती संभाजीनगर : दोन्ही डोळ्यांनी दुष्टीहीन मात्र कोणाकडं भीक न मागता कष्टानं आपलं कुटुंब उभं केलं. डोळ्यांनी दिसत नाही तरी बूट, चप्पल दुरुस्त करणं आणि पॉलिश करण्याचं काम जन्मतःच दोन्ही डोळ्यांनी दुष्टीहीन असलेले पूनमचंद निंभोरे करतात. परिश्रम घेऊन वाढवलेल्या मुलांनी साथ सोडली. मात्र, त्यांच्यातील असलेल्या कलेनं ते आजही ताठ मानेने त्यांच्या पत्नीसह उदरनिर्वाह करत आहेत.
सिग्नलवर काम करून उदरनिर्वाह : शहरातील जिल्हा सत्र न्यायालयाच्या सिग्नलवर बूट पॉलिश करणारे पूनमचंद निंभोरे एक वशिष्ठपूर्ण व्यक्तिमत्त्व आहेत. जन्मतःच दोन्ही डोळ्यांनी ते दुष्टीहीन आहेत. वडील बूट पॉलिश आणि जुन्या चपला, बूट शिवून देण्याचं काम करत होते. डोळ्यांनी दिसत नसल्यानं ते काही काम करू शकत नव्हते. मात्र, वडिलांसोबत जाऊन तिथे बसत होते. हळूहळू त्यांनी पॉलिश ब्रश हातात घेतला आणि बूट चकाचक करण्याचा प्रयत्न सुरू केला. काही वर्षांनी वडिलांचं निधन झालं, आता पोटाचा प्रश्न निर्माण होईल असं वाटत असताना वडिलांचं काम त्यांनी करण्याचा निर्धार केला. सिग्नलवर छोटेसे दुकान थाटले आणि सुरू झाला रोजगार.
अंधांसाठी योजनांचा नाही मिळाला लाभ : दिव्यांग व्यक्तींसाठी काही योजना राबवल्या जातात. मात्र, आजपर्यंत त्यांचा लाभ मिळाला नसल्याची माहिती पूनमचंद निंभोरे यांनी दिली. "संजय गांधी निराधार योजना सारख्या योजनांमध्ये अर्ज केला, सांगितलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली असली तरी आजपर्यंत केलेल्या अर्जाचे काय झाले माहीत नाही असं त्यांनी सांगितलं. पत्नी आणि मी दोघे कुटुंबाचा गाडा हाकतो. माझी पत्नी सकाळी नऊच्या सुमारास मला दुकानाजवळ सोडते, नंतर ती लोकांच्या घरी धुणी-भांडी करायला जाते. सायंकाळी पाच वाजता ती मला घरी घेऊन जाते. दोन मुले, दोन मुली, नातू असं कुटुंब आहे. मात्र, कोणीही सांभाळत नाही. मुलं मोठी झाली, त्यांचं लग्न केलं. तरी त्यांच्या संसारात आम्हाला त्यांना सांभाळणं होत नाही. म्हणूनच पत्नी सोबत क्रांतीनगर येथे भाड्याच्या वेगळ्या घरात राहतो", अशी माहिती पूनमचंद यांनी दिली.
अंध असलं तरी करतात अचूक काम : दोन्ही डोळ्यांनी शंभर टक्के अंधत्व असलं तरी पूनमचंद मोठ्या कुशलतेनं काम करतात. बुटांना पॉलिश करताना ग्राहकांना फक्त रंग विचारतात, आणि काम सुरू करतात. बुटाची लेस काढून ती पुन्हा लावताना ते अंध आहेत हे मुळीच वाटत नाही. मोठ्या सफाईने पॉलिश करतात, त्याचबरोबर फाटलेले बूट, चप्पल शिवताना देखील सफाईदार काम ते करतात. ग्राहकानं दिलेली नोट ते अचूक ओळखतात आणि उरलेले पैसे देखील अचूक पद्धतीनं परत करतात. न्यायालयात येणारे अनेक वकील पूनमचंद यांच्याकडून आपल्या बुटांना पॉलिश करून घेतात. ठरलेल्या पैशांसोबत प्रेमाने काही अधिकचे पैसे मदत म्हणून देतात. त्यातून बायकोसह उदरनिर्वाह होत असल्याची माहिती, पूनमचंद निंभोरे यांनी दिली.
हेही वाचा -
- 'दृष्टी नाही पण गाठीला इच्छाशक्ती' याच जोरावर ‘त्या’ 48 साहसवीरांनी सर केला पुरंदर किल्ला
- दोन्ही डोळ्यांनी बैल अंध, विकण्याचा सल्ला; सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्याचं 'सोन्या'नं पांग फेडलं
- अंध असूनही बनले हरहुन्नरी कलाकार; रेडिओ कानाला लावून शिकणाऱ्या नंदकिशोर घुलेंची वाचा प्रेरणादायी कहाणी - Nandkishor Ghule Success Story