मुंबई : दिग्गज अभिनेता अन्नू कपूर हे इंडस्ट्रीतील प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी स्वतःला अभिनेता, होस्ट, आरजे आणि विनोदी कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत सिद्ध केलं आहे. अन्नू कपूर हे असे अभिनेते आहे, जे कोणतीही भूमिका सहज करू शकतात. मात्र अन्नू कपूर यांनी चित्रपटसृष्टीत नाव कमाविण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अन्नू कपूर यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1956 रोजी झाला. त्यांनी 1970 च्या दशकात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 1979 मध्ये रंगभूमीवर अभिनयाची सुरुवात केल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना 'रुका हुआ फैसला '(1984) या चित्रपटातून खरी ओळख मिळाली.
अन्नू कपूरचा वाढदिवस : अन्नू कपूर यांचा पहिला चित्रपट 1983 मध्ये प्रदर्शित झालेला 'मंडी' होता. अन्नू कपूर यांनी वर्षानुवर्षे आपल्या अभिनयानं चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. याशिवाय त्यांनी चित्रपटसृष्टीत त्यांच्या आवाजाची जादू देखील दाखवली आहे. अभिनयाबरोबरचं त्यांनी अनेक टीव्ही शो होस्ट केले आहेत. दरम्यान अन्नू कपूर सुरुवातीला आयएएस अधिकारी बनू इच्छित होते. मात्र अभिनय क्षेत्रात आल्यानंतर ते त्याचे शिक्षण पूर्ण करू शकले नाही. तसेच आर्थिक अडचणीमुळे त्यांनी चहा देखील विकला. मात्र त्यात देखील यश आलं नाही. यानंतर त्यांनी लॉटरीची तिकिटेही विकण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी एक मोठा निर्णय घेतला.
अन्नू कपूरचं वर्कफ्रंट : अन्नू कपूर यांनी एनएसडीमध्ये प्रवेश घेतला. यानंतर त्यांचे आयुष्य बदलले. आज अन्नू कपूर यांची गणना ही मोठ्या स्टार्समध्ये केली जाते. अन्नू कपूर आता 170 कोटी संपत्तीचे मालक आहेत, अशा अनेकदा बातम्या समोर आल्या होत्या. मात्र त्याच्या एकूण संपत्तीबद्दल कोणतेही अधिकृत आकडा उपलब्ध नाहीत. अन्नू कपूर यांनी आपल्या कारकिर्दीत 'ड्रीम गर्ल', 'ड्रीम गर्ल 2', 'हमारे बाराह' आणि 'जॉली एलएलबी 2' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच अन्नू कपूर यांनी अंताक्षरी या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन देखील केलं होतं. आता अन्नू कपूरच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ते पुढं 'जॉली एलएलबी 3' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.