न्यूयॉर्क ICC T20 World Cup IND vs IRE : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात आज भारत विरुद्ध आयर्लंड सामना झाला. उभय संघांमधील हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघानं 8 गडी राखत दणदणीत विजय मिळवलाय. यायह भारतानं टी-20 विश्वचषकात विजयी सुरुवात केलीय. आयर्लंडनं भारताला विजयासाठी दिलेल्या 97 धावांचं माफक लक्ष्य भारतीय संघानं 13 व्या षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मानं सर्वाधिक 52 धावा केल्या तर ऋषभ पंतनं नाबाद 36 धावा करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
आयरीश फलंदाजांची शरणागती : तत्पुर्वी या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना आयरिश संघ 16 षटकांत अवघ्या 96 धावांत गडगडला. भारतीय वेगवान गोलंदाजांसमोर आयरिश संघाच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली आणि सुरुवातीपासूनच त्यांच्या विकेट पडत राहिल्या. केवळ गॅरेथ डेलेनी, जोशुआ लिटल, कर्टिस कॅम्फर आणि लॉर्कन टकर यांना दुहेरी आकडा गाठता आला. डेलेनीनं 14 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांसह सर्वाधिक 26 धावा केल्या. लिटलनं 14 धावांचं, कॅम्परनं 12 आणि टकरनं 10 धावांचं योगदान दिलं. भारताकडून हार्दिक पांड्यानं सर्वाधिक तीन बळी घेतले. अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेड-टू-हेड रेकॉर्ड काय :आयर्लंडविरुद्धचा भारतीय संघाचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. या संघाविरुद्ध भारतानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारत आणि आयर्लंडमध्ये आतापर्यंत एकूण 7 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यात भारतीय संघानं सर्व सामने जिंकले. त्याचबरोबर भारतानं तीन एकदिवसीय सामन्यांमध्येही विजय मिळवलाय.
विराट कोहली येणार सलामीला :भारतीय संघानं या सामन्यासाठी चायनामन गोलंदाज कुलदीप यादव, यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन, लेग-स्पिनर युजवेंद्र चहल आणि सलामीवीर यशस्वी जैस्वाल यांचा अंतिम संघात समावेश केलेला नाही. अशा स्थितीत विराट कोहली आणि रोहित शर्मा सलामीला येतील. दुसरीकडे, आयर्लंडनं आपल्या प्लेइंग-11 मध्ये क्रॅग यंग, नील रॉक, ग्रॅहम ह्यूम आणि रॉस एडेअर यांचा समावेश केला नाही.