दुबई ICC T20I Ranking Update :भारतीय क्रिकेट संघाचा T20 कर्णधार सूर्यकुमार यादव याला ICC क्रमवारीत यावेळी मोठा फटका बसला आहे. यात तो पहिल्या क्रमांकावर होता, नंतर दुसऱ्या क्रमांकावर आला, पण आता त्याला तिथूनही खाली यावं लागलं आहे. इतकंच नाही तर भारतीय संघाचा आणखी एक फलंदाज यशस्वी जैस्वाललाही क्रमवारीत नुकसान झालं आहे. मात्र सूर्या अजूनही तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे ही दिलासादायक बाब आहे. मात्र, तो इंग्लंडच्या फिल सॉल्टच्या मागे आहे.
ट्रॅव्हिस हेड T20 मध्ये पहिल्या क्रमांकावर : भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ यांच्यात खेळल्या जाणाऱ्या T20 मालिकेदरम्यान ICC नं T20 क्रमवारी जाहीर केली. यात ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याचं रेटिंग 881 आहे. आता सूर्यकुमार यादवच्या जागी इंग्लंडच्या फिल सॉल्टनं दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. सॉल्टनं वेस्ट इंडिजविरुद्ध नुकतंच शतक झळकावलं होतं, आता त्याचा फायदा त्याला मिळत असल्याचं दिसतंय. एका स्थानाची झेप घेत तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचं रेटिंग 841 झालं आहे. आतापर्यंत दुसऱ्या क्रमांकावर असलेला सूर्यकुमार यादव आता खाली आला आहे. यापूर्वी त्याचं रेटिंग 818 होतं, ते आता 803 वर आलं आहे. एका स्थानाच्या नुकसानासह तो आता तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे.
जॉस बटलरला फायदा, यशस्वी जैस्वालला नुकसान : या क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचं रेटिंग 755 आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान 746 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडच्या जॉस बटलरला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता 726 च्या रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. बटलर तब्बल चार महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय सामन्यात परतला आहे. त्याच्या दुसऱ्याच सामन्यात त्यानं स्फोटक खेळी खेळली. तर यशस्वी जैस्वालला एका स्थानाचं नुकसान झालं आहे. तो आता 720 च्या रेटिंगसह सातव्या क्रमांकावर गेला आहे.
निकोलस पुरनचा टॉप 10 मध्ये प्रवेश : श्रीलंकेच्या पथुम निसांकानं ६७२ रेटिंगसह आठव्या क्रमांकावर आपलं स्थान कायम राखण्यात यश मिळविलं आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या जोश इंग्लिशला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता 652 च्या रेटिंगसह नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. इतकंच नाही तर वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन दीर्घ कालावधीनंतर पहिल्या दहामध्ये परतला आहे. तो आता 645 च्या रेटिंगसह 10 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याला यावेळी क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला आहे. अफगाणिस्तानच्या रहमानउल्ला गुरबाजनं 4 स्थानांची झेप घेतली आहे, मात्र तरीही तो 11व्या क्रमांकावर आहे. त्याचं रेटिंग सध्या 636 वर आहे.
हेही वाचा :
- T20 मालिकेदरम्यानच संघात मोठा बदल निलंबित खेळाडूला संघात स्थान
- भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा T20 सामना आज, कोण घेणार मालिकेत विजयी आघाडी? 'इथं' दिसेल लाईव्ह सामना