मुंबई- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केलाय. तब्बल आठव्यांदा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प जाहीर केलाय. या अर्थसंकल्पातून अनेक घटकांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलाय. विशेष म्हणजे नोकरदार वर्गासाठी आनंदाची बाब म्हणजे 12 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असले तरी कोणताही कर लागणार नाही. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. परिणामी नोकरदार वर्गाच्या पैशाची बचत होणार असून, हा अर्थसंकल्पाला आम्ही 100 पैकी 95 मार्क देतो, असं विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटलंय.
सामान्य लोकांचे स्वप्न पूर्ण होणार : या बजेटमध्ये विविध घटकांसाठी आणि विविध क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्यात. तसेच कॅपिटल मार्केट आणि फायनान्स क्षेत्रातही अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्यात. त्यामुळे फायनान्स क्षेत्रात जे गुंतवणूक करणार आहेत, त्यांच्यासाठी हे बजेट दिलासादायक असल्याची प्रतिक्रिया कॅपिटल मार्केटतज्ज्ञ आणि आयएमसीचे को-चेअरमन अतीत संघवी यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे एलईडी टीव्ही यांचे भाव कमी होणार आहेत. तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रातील AV बॅटरी यांचे दर कमी होणार आहेत. त्यामुळे स्वाभाविकरीत्या भाव कमी झाल्यामुळे गाड्यांच्या किमतीत घसरण होईल आणि त्यामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना गाडी खरेदी करता येईल. गाडी खरेदी करण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, अशी प्रतिक्रिया आणि ऑटो मोबाईल तज्ज्ञ आणि आयएमसीच्या को-चेअरमन जोत्स्ना सांघी यांनी दिलीय.
नोकरदार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण : दुसरीकडे करामध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेत आणि महत्त्वाचे घोषणा करण्यात आल्यात. यापूर्वी नोकरदार वर्गाला वार्षिक पाच लाखांहून अधिक उत्पन्न असेल तर प्राप्तिकर भरावा लागत असे. मात्र आता 7 लाखांवरून 12 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही प्राप्तिकर भरावा लागणार नाही. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असल्याची प्रतिक्रिया करतज्ज्ञ विमल पुनामिया यांनी दिलीय. तसेच दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बिहार राज्यासाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्यात आणि महाराष्ट्र राज्यासाठी कोणतीही महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली नसल्यासंदर्भात विमल पुनामिया यांना विचारला असता ते म्हणाले, मला वाटत नाही की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बिहारसाठी काही दिले असेल. महाराष्ट्राच्या तुलनेत बिहार हा मागासलेला आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची प्रगती झाली आहे आणि बिहारमध्ये उद्योगधंदे, रोजगार नसल्यामुळे बिहारसाठी मोठी घोषणा झाली असावी, असेही करतज्ज्ञ विमल पुनामिया यांनी म्हटलंय.
हेही वाचाः
12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही, अर्थमंत्र्यांकडून मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट
महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय मिळालं? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,"सर्वाधिक..."