मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रांमधून मुंबईतील मराठी माणसाच्या भावनांना आणि मराठी माणसांवरील अन्यायाला वाचा फोडली. ही व्यंगचित्र प्रसिद्ध होणाऱ्या 'साप्ताहिक मार्मिक'चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचं निधन झालं.
मार्मिक साप्ताहिकाचे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे. ते 91 वर्षाचे होते. आज दुपारी अंत्ययात्रा निघणार आहे. भोईवाडा येथील स्मशानभूमीत पंढरीनाथ सावंत यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मार्मिक साप्ताहिकाचे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत हे लालबाग येथील दिग्विजय मिल परिसरातील पत्रा चाळ येथे वास्तव्याला होते. येथेच त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. परखड, थेट आणि रोखठोक आपली मते मांडणारा पत्रकार अशी पंढरीनाथ सावंत यांचे अनेक वर्ष महाराष्ट्राला ओळख आहे.
या पुरस्कारानं झाला होता गौरव- पंढरीनाथ सावंत यांच्या पत्रकारितेची दखल अनेकांनी घेतली. त्यांना विविध पुरस्कारानंदेखील गौरविण्यात आलं आहे. मंत्रालयाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कारानं सावंत यांना गौरविण्यात आलं आहे. सोबतच, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर कक्षाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कृ. पा. सामक जीवनगौरव पुरस्कारानंदेखील पंढरीनाथ सावंत यांना गौरविण्यात आलं आहे.
मुंबईवर पुस्तक लिहिण्यास केली होती सुरुवात- पंढरीनाथ सावंत यांनी प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहे ठाकरे यांच्यासोबत काम केलं होतं. त्यांनी जीवनातील अनुभवावर 'मी पंढरी गिरणगावचा' हे आत्मचरित्र लिहिलं आहे. त्यामध्ये लालबाग आणि परळ येथे राहणाऱ्या कापड गिरणी कामगारांच्या जीवनाविषयी प्रकाश टाकला. सुरुवातीच्या काळात त्यांनी बेस्टमध्ये कंडक्टर म्हणून काम केले. त्यानंतर पत्रकार म्हणून काम केले. 'मार्मिक' मध्ये त्यांनी कार्यकारी संपादक काम केले. त्यांनी अनेक पत्रकार घडविलं. अलीकडच्या काळात त्यांनी मुंबईबाबत पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली होती.
आत्मचरित्र हा ऐतिहासिक दस्ताऐवज- बाळासाहेब ठाकरे यांनी पंढरीनाथ सावंत यांच्या आत्मचरित्राबाबत 13 ऑगस्ट 200 रोजी पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी 'मी पंढरी गिरणगावचा' या आत्मचरित्राविषयी कौतुक केलं होतं. त्यांनी पत्रात म्हटलं होतं, "पंढरी हे पत्रकार-लेखक म्हणून आमच्या घरचं 'प्रॉडक्ट' आहे. मुंबईतील कारखान्यात हेल्पर, गणपतीच्या कारखान्यात रंगारी, बेस्ट बसमध्ये कंडक्टर, अंगावर खाकी कपडे घालून चित्रकलेचे शिक्षण आणि म्युनिसिपालिटीच्या उर्दू शाळेत चित्रकला शिक्षण आणि शेवटी पत्रकार असा त्यांचा प्रवास राहिला. हा आत्मचरित्रासाठी चांगला मसाला आहे. त्यांनी जगाचा साक्षीदार म्हणून चरित्र लिहिल असल्यानं हा इतिहास झाला. त्यामुळे विसाव्या शतकाच्या अर्ध्याहून अधिक भाग हा ऐतिहासिक दस्तऐवज ठरतो."