नवी दिल्ली : दिल्लीच्या निवडणुकीत सुरुवातीचे कल पाहता भाजपा पक्ष सत्तेवर येईल असं दिसून येत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी शनिवारी येथील पक्षाच्या कार्यालयात बैठक घेतली. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये असं दिसून येत आहे की पक्ष २७ वर्षांनंतर राष्ट्रीय राजधानीत सरकार स्थापन करण्यास सज्ज होत आहे.
दिल्ली भाजपाचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा, केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा आणि पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते. निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, भाजपानं ४५ जागांवर आघाडीवर घेतली तर आम आदमी पक्ष २५ जागांवर आघाडीवर असल्याचं दिसून आलं. दिल्ली निवडणूक निकालांमध्ये काँग्रेसला अद्याप खातं उघडता आलेलं नाही. यावेळी, दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, दिल्लीच्या लोकांनी पंतप्रधान मोदींचं चांगल्या प्रशासनाचं मॉडेल निवडले आहे आणि सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपानं बहुमताचा आकडा ओलांडल्यामुळं अरविंद केजरीवाल यांचं वाईट मॉडेल नाकारलं आहे.
एएनआयशी बोलताना सचदेवा यांनी सांगितलं की, ही निवडणूक सुशासन आणि वाईट प्रशासन यांच्यातील लढाई होती. "दिल्लीतील परिस्थिती - दूषित पाणी, खराब झालेले रस्ते, स्वच्छतेचा अभाव, यमुनेतील प्रदूषण आणि बरेच काही हे केजरीवाल यांच्या प्रशासन मॉडेलचं प्रतिबिंब होतं, जे "दिल्लीच्या लोकांनी नाकारले आहे," असंही ते म्हणाले. "दुसरीकडे, मोदीजींचं सुशासनाचे मॉडेल असं आहे ज्याचा संपूर्ण देश आदर करतो. लोकांनी सुशासन निवडलं आहे," असं ते पुढे म्हणाले. आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल, आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांच्यासह निकालांमध्ये पिछाडीवर होते. ही बातमी करतानाच केजरीवाल पराभूत झाल्याचं वृत्त आलं आहे. याबद्दल बोलताना, दिल्ली भाजपा प्रमुख म्हणाले की ते हरतील अशी अपेक्षा होतीच कारण त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. "त्यांचे इतरही प्रमुख नेते निवडणुकीत पराभूत होतील कारण त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, आतिशी हे सर्व भ्रष्टाचाराचे चेहरे आहेत. जनता त्यांना माफ करणार नाही," असं वीरेंद्र सचदेवा म्हणाले.
दिल्लीत ७० सदस्यांच्या विधानसभेसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान झालं. यामध्ये एकूण ६०.५४ टक्के मतदान झालं. प्रमुख मतदारसंघांमध्ये नवी दिल्लीचा समावेश आहे, जिथे आप नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काँग्रेस नेते संदीप दीक्षित आणि भाजपाचे परवेश वर्मा यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना हार पत्करावी लागली.