कोल्हापूर - दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला यश मिळाल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचा अजूनही करिष्मा कायम असल्याचं म्हटलं. दुसरीकडं शिवसेना यूबीटीचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकादेखील केली. ते माध्यमांशी बोलत होते.
काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र लढली असती तर निकाल वेगळा आला असता, असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं होतं. याला प्रत्युत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, "खासदार संजय राऊत महान नेते आहेत. ते दोघांमध्ये समझोता करू शकले असते. काँग्रेसला सपोर्ट न करता शिवसेना उबाठानं आपला सपोर्ट केला आहे. येथेच मोठी ठिणगी पडली आहे. आता त्या आघाडीतून इतर बाहेर पडण्यापेक्षा काँग्रेसच बाहेर पडेल. जादूच्या कांडीनं रिझल्ट चांगले मिळतात असं वाटत असेल तर त्यांनी पत्रकार परिषद न घेता साधना करावी. जादूची कांडी शोधावी," असा टोलाही पाटील यांनी खासदार राऊत यांना लगावला.
मोदींचा करिष्मा कायम - "देशाची राजधानी दिल्ली विधानसभेत भारतीय जनता पार्टीने मिळवलेलं यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वसामान्यांचा विश्वास वाढल्याचं उदाहरण आहे. भाजपाच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यास लोकांचा आणि राज्याचा विकास होणार आहे. लोकसभेला मिळालेल्या यशानंतर पंतप्रधान मोदींचा करिष्मा संपल्याचं विरोधकांना वाटलं. मात्र, मोदींचा करिष्मा संपला नाही. संपणार नाही," अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
खोटं नरेटीव्ह सेट होते - पुढे भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, "2024 च्या लोकसभा निवडणुकीत खोटं नरेटीव्ह सेट करण्यात आलं. मात्र, त्यानंतर लोकांना कळलं की गडबड झाली. विधानसभेला त्यांनी करेक्ट केलं. यामुळे महाराष्ट्र आणि हरियाणात एकतर्फी यश मिळालेलं आहे. दिल्लीमध्येदेखील हीच परिस्थिती आहे. दिल्ली विधानसभेत सरकार येत आहे. चांगल्या मार्जिननं सरकार येत आहे."
राहुल गांधींवर टीका- राहुल गांधी यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषेदवरून चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, "दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेला दावा फोल ठरला. काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी काल पत्रकार परिषद घेऊन आकडेवारी मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला निवडणूक आयोग उत्तर देईल. एकसारखी कॅसेट चालवणं काँग्रेसनं आता बंद करावं. कर्नाटकात यश मिळालं की ईव्हीएम चांगलं असतं. महाराष्ट्रात विरुद्ध निकाल लागला की घोटाळा झाला म्हणता."
5 लाख बहिणींना वगळलं, आरडाओरडा करण्याची गरज नाही- "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 2 कोटी 42 लाख महिलांना लाभ मिळालेला आहे. मग, ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणायचं की अर्धा भरलेला आहे, असं म्हणायचं? कार असलेले, इन्कम टॅक्स भरलेला किंवा एका घरात अनेक महिलांनी लाभ घेतलेल्या ५ लाख महिलांना वगळण्यात आलं. यामध्ये इतकं आरडाओरडा करण्याची गरज नाही. गेलेले पैसे पुन्हा घेणार नाही, अशी कॅबिनेटमध्ये चर्चा झली," अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली.
हेही वाचा..