पालघर - भारतीय जनता पक्षाने एक जानेवारीपासून संघटन पर्व सुरू केलं आहे. या संघटन पर्वात भारतीय जनता पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेनं चांगलीच गती घेतलीय. आत्तापर्यंत एक कोटी दोन लाख सदस्य नोंदणी झाली आहे. सदस्य नोंदणीचा दीड कोटींचा टप्पा निश्चित ओलांडून त्यापेक्षा अधिक सदस्य नोंदणी होईल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
संघटन पर्व आढावा बैठक - पालघर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संघटन पर्व आढावा बैठक घेण्यात आली. तसंच पालघर तालुक्यातील तारापूर कुडण येथील भास्कर पार्क येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चव्हाण यांनी विधानसभानिहाय आढावा घेतला. या आढावा बैठकीच्या वेळी पालघर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाचे तसंच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात दाखल झाले. त्यांचं स्वागत आणि सत्कार चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपाचे मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे काही सदस्यही भाजपात दाखल झाले.
मित्र पक्षाचे कार्यकर्तेही भाजपात - चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला एक विचार दिला आहे. विश्व शक्ती मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास अनेक पक्षांचे नेते कार्यकर्ते उत्सुक आहेत. त्यामुळे मित्र पक्षाचे काही कार्यकर्ते पक्षात सहभागी झाले आहेत. विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीही पक्षात प्रवेश केला. त्यात मुख्यतः जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, उपसभापती, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांचा समावेश आहे.
महायुतीच्या नेत्यात चांगले बाँडींग - महायुतीतील काही प्रश्नाबाबत चव्हाण म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चांगले बॉण्डिंग आहे. त्यांच्यात समन्वय आहे. राज्यातले कुठलेही प्रश्न ते सोडवू शकतात. त्यामुळे गैरसमज असण्याचे काही कारण नाही.
गेल्या काही वर्षांपासून गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली मी कामगार संघटनेचे काम करीत होतो. आताही करतो आहे. पालघर जिल्ह्यात रवींद्र चव्हाण यांनी पालकमंत्री असताना भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात वाढवला. आता नाईकच पालकमंत्री आहेत. मोदी यांनी जगभर आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे. खासदार डॉ. हेमंत सावरा यांचे कामही चांगले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी समजून आम्ही भाजपामध्ये सामील झालो आहोत. एक दिवसाच्या कमी कालावधीत हा प्रवेश झाला. शिवशक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली आणखी मोठा प्रवेश सोहळा लवकरच करू. - संजय पाटील, अध्यक्ष, शिवशक्ती संघटना
उद्दिष्टांपेक्षाही अधिक सदस्य नोंदणी होणार - फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघटन पर्वात दीड कोटी सदस्य नोंदणीचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट आम्हाला ठरवून दिले असले, तरी त्यापेक्षा अधिक सदस्य नोंदणी होईल, हे मी विश्वासाने सांगू शकतो.
कोण होते उपस्थित? - यावेळी शिवशक्ती संघटनेचे संजय पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, बाबाजी कोठाळे, आ. हरिश्चंद्र भोये, तुषार संखे, पंचायत समिती उपसभापती मिलिंद वडे, प्रदेश उपाध्यक्षव अतुल काळसेकर, प्रदेश सचिव राणीताई द्विवेदी, सुरेखा थेतले, माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, सरचिटणीस सुशील औसरकर, जिल्हा उपाध्यक्ष पंकज कोरे, संदीप पावडे, वीणा देशमुख, युवा मोर्चाचे निखिल चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपाच्या सदस्य नोंदणीची बैठक पार पडली.
हेही वाचा..