अमरावती : हिवाळ्यात उत्तर भारतात थंडीची प्रचंड लाट असल्यामुळं लडाखसह हिमालयातील विविध पक्ष्यांसोबतच चक्रवाक हा पक्षी मध्य आणि दक्षिण भारतात येतो. या पक्ष्यांचा मुक्काम मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतांनी वेढलेल्या मेळघाटच्या जंगलात असतो. मेळघाटात पोहोचल्यावर चक्रवाक पक्षी आपला जोडीदार निवडतो. जोडी उन्हाळ्यात आपल्या मायदेशी निघून जाते. चक्रवाकची जोडी मेळघाटातील पाणवठ्यांवर बनत असल्यामुळं मेळघाटातील आदिवासी कोरकू बांधव हे पाणवठे म्हणजे चक्रवाकांची "घुंगडू हाटी" आहे असं म्हणतात. एकूणच मेळघाटातील चक्रवाकांचं वास्तव्य आणि कोरकू बांधवांच्या घुंगडू हाटी यासंदर्भात "ईटीव्ही भारत"चा हा स्पेशल रिपोर्ट.
मेळघाटातील 600 पाणवठ्यांवर परदेशी पाहुणे : "मेळघाटात एकूण 600 पाणवठे आहेत. या पाणवठ्यांवर विविध ऋतूंमध्ये विविध देशातून अनेक पक्षी येतात. चक्रवाक पक्ष्यांचा थवा उत्तरेकडून नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये येतो. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात हिमालयात मोठ्या प्रमाणात बर्फ असतो. बर्फामुळे या पक्षांना अन्न मिळत नसल्यामुळं अन्नाच्या शोधात हे पक्षी मेळघाटात येतात. मेळघाटात असणाऱ्या पाणवठ्यांवर चक्रवाक मोठ्या संख्येनं दिसतात. विशेष म्हणजे चक्रवाक हा नेहमी जोडीने दिसतो" अशी माहिती मेळघाटातील रहिवासी आणि निसर्गमित्र धनंजय सायरे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली.
असं आहे चक्रवाकाचं वैशिष्ट्य : "चक्रवाक हा पक्षी म्हणजे बदकांमधलाच प्रकार असून हा पक्षी पाण्यात राहण्याऐवजी पाणवठ्याच्या परिसरात जमिनीवर राहतो. चक्रवाक हा बदकाच्या आकारा इतका पक्षी आहे. नर चक्रवाक केशरी-बदामी रंगाचा असून त्याच्या डोक्याचा आणि मानेचा रंग थोडा फिकट असतो. त्याच्या मानेभोवती काळ्या रंगाचे वर्तुळ असतात. त्याचे पंख काळे, पांढरे आहेत. मादी देखील नरासारखीच मात्र, तिच्या मानेच्याखाली काळ्या रंगाचे वर्तुळ नसतात. जमिनीवरील गवत, पाला यासोबतच छोटे-मोठे कीटक आणि बेडूक हे या पक्षाचं खाद्य आहे" अशी माहिती धनंजय सायरे यांनी दिली.
जमिनीवरच असतं घरटं : चक्रवाक हा पक्षी इतर पक्षांप्रमाणे झाडांवर घरटं न बांधता तो जमिनीवरच पालापाचोळ्यामध्ये घरटं तयार करून राहतो. मार्च, एप्रिल महिन्यात हा पक्षी हिमालयात परत गेल्यावर त्याचा विणीचा हंगाम असतो. त्यावेळी हे पक्षी सुरक्षित ठिकाणी घरटं बांधून त्यामध्ये अंडी देतात. नर आणि मादा हे दोघेही पिलांची काळजी घेतात. हे पक्षी कायम जोडीनंच दिसतात.
चक्रवाक आणि घुंगडू हाटी : मेळघाटात कोरकू जमातीत लग्नासाठी आपला जोडीदार निवडण्याकरता विशेष अशी परंपरा आहे. दिवाळी झाल्यावर मेळघाटातील ज्या मोठ्या गावांमध्ये आठवडी बाजार भरतो. त्या आठवडी बाजारांमध्ये नियमित बाजारासोबतच घुंगरू बाजार देखील भरतो. एखाद्या गावात रविवारी, तर एखाद्या गावात सोमवारी आणि कुठं शुक्रवारी, बुधवारी, गुरुवारी असा आठवडी बाजार असतो. दिवाळीनंतर घुंगरू बाजार भरतो. या बाजारात विविध प्रकारचे घुंगरू विकायला येतात. कोरकू भाषेत घुंगरला घुंगडू आणि बाजाराला हाटी म्हणतात. घुंगडू हाटीत विवाहासाठी इच्छुक असणारे युवक आणि युवती आपला जोडीदार स्वतः निवडतात. या ठिकाणी जोडीदार निवडल्यावर पुढं त्यांचं कुटुंब त्यांचं लग्न लावून देतं. ज्याप्रमाणं घुंगडू हाटीत युवक-युवती जोडीदार निवडतात अगदी तसंच चक्रवाक पक्षी हे मेळघाटातील पाणवठ्यांवर आपला जोडीदार निवडतात आणि आयुष्यभर आपल्या जोडीदारासोबत राहतात, असं मेळघाटातील कोरकू बांधव म्हणत असल्यामुळं मेळघाटातील पाणवठे म्हणजे चक्रवाकांचा घुंगरू बाजार अर्थात घुंगडू हाटी असतं असं म्हटलं जातं.
हेही वाचा :