नाशिक : जिल्ह्यातील गिधाडांच्या संवर्धनासाठी वन्यप्राणी संस्थेनं पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात पाच ठिकाणी वन विभागानं विशेष रेस्टॉरंट तयार केली आहेत. तेथे मृत प्राण्याचे मांस गिधाडांसाठी देण्यात येते. देशात नऊ प्रकारची गिधाडे असून त्यापैकी पाच प्रकारची गिधाडे ही नाशिक जिल्ह्यात आढळतात. अशात दिवसेंदिवस गिधाडांची संख्या कमी होत असल्यानं त्यांच्या संवर्धनासाठी लोक चळवळ महत्त्वाची असल्याचं मत प्रणव भानोसे यांनी व्यक्त केलं आहे.
गिधाडांविषयी माहिती : वन्य जीवनाच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा असलेल्या गिधाडांच्या संवर्धनासाठी वन विभागासोबतच आता वन्यप्राणी संस्थेनं देखील पुढाकार घेतला आहे. दिवसेंदिवस गिधाडांची संख्या कमी होत असल्यानं हा चिंतेचा विषय ठरला आहे. अशात आता गिधाडांच्या संवर्धनासाठी वनविभागानं जिल्ह्यातील बोरगड, अंजनेरी, हरसुल, पेठ येथे खास जागा केल्या असून त्याला रेस्टॉरंट म्हटलं जातंय. रस्ता अपघातात मृत्यू झालेली जनावरं येथे टाकली जातात. ही मृत जनावरं गिधाडे 20 मिनिटांत फस्त करतात. सडलेले मांस पचवण्याची त्यांची क्षमता आहे. तसंच या रेस्टॉरंटमध्ये त्यांना पिण्यासाठी पाणी आणि बसण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गिधाडांचा प्रजनन काळ हा एक वर्षाचा असल्यानं त्यांच्या संख्यावाढीचं प्रमाण कमी आहे. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात एक हजाराच्या जवळपास गिधाडे आहेत. त्यामुळं ती सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं मत वन्यजीव प्रेमी प्रणव भानोसे यांनी मांडलय.
मृत जनावरे रेस्टॉरंट पर्यंत पोहोचवावीत : नैसर्गिक मृत्यू किंवा रस्ता अपघातात मृत झालेली जनावरे उचलून वनविभागाच्या गिधाड रेस्टॉरंटपर्यंत पोहोचवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने यंत्रणा उभी करावी. यासाठी लवकरच आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेऊन त्यांना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं निवेदन देण्यात येणार असल्याचं, यशवंतराव चव्हाण सेंटरचे समन्वयक भूषण काळे यांनी सांगितलं.
'या' कारणांमुळं गिधाडांची संख्या कमी झाली : गिधाडाचं आयुष्य हे 50 ते 60 वर्ष आहे. मात्र अनेकदा शेतकऱ्यांकडून गुरांना डायकोफिनॅक इंजेक्शन दिलं जातं. अशी इंजेक्शन दिलेली मृत जनावरं खाल्ल्यानं गिधाडांना किडनी आणि लिव्हरचा आजार होतो. त्यामुळं त्यांचा लवकर मृत्यू होतो. 1992 ते 2002 या दहा वर्षात गिधाडांची संख्या 96 टक्क्यांनी कमी झाली होती. काही वन्यप्रेमी संघटनांच्या मागण्यावरून या इंजेक्शनवर सरकारनं बंदी आणली. त्यामुळं आता गिधाडांची संख्या वाढण्यास मदत होत असल्याचं प्रणव भनोसे यांनी सांगितलं.
म्हणून कुत्र्यांची संख्या वाढली : नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालंय, त्यामुळं अनेक उंच झाडे तोडण्यात आली. त्यामुळं गिधाडांचा निवारा शहरात राहिला नाही. सुरुवातीच्या काळात गिधाडांना सहजरित्या शहरात अन्न मिळत होतं. मात्र ते आता मिळत नसल्यानं गिधाडांप्रमाणे मांसाहारी अन्नाला प्रतिस्पर्धी असलेल्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं वन्यप्रेमींनी सांगितलं.
हेही वाचा -