पुणे : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत २७ वर्षानंतर भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळताना पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या या निकालानंतर आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पुणे शहर कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला. यावेळी ढोल वाजवत, पेढे भरवत, महिला कार्यकर्त्यांनी फुगडी खेळत आणि जोरदार घोषणाबाजी करत महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जल्लोष केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाची प्रगती : आनंद साजरा करताना भाजपा राज्य कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले, "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. त्यामुळं सामान्य जनतेमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. शेतकरी, कष्टकरी यांना नरेंद्र मोदींचं सरकार सातत्यानं आधार देण्याचं काम करत आहे. विरोधकांनी कितीही नरेटीव सेट केला तरी, देशाचं भविष्य भारतीय जनता पार्टी आहे, हे लोकांना समजलं आहे. भाजपा सर्वसामान्य जनतेच्या हिताचं काम करणारा पक्ष आहे. दिल्लीमध्ये 27 वर्षानंतर भाजपाला यश मिळालं आहे. पंतप्रधान मोदींचं सरकार अतिशय पारदर्शकपणे काम करत आहे. आपनं दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार केला होता, त्याला जनता वैतागली होती आणि म्हणून भाजपाला दिल्लीत स्पष्ट बहुमत मिळालं आहे."
त्यांच्या विधानाकडं दुर्लक्ष करा : राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर चव्हाण म्हणाले, "एक्झिट पोल सांगत होता की, भाजपाला दिल्लीत बहुमत मिळणार आहे. पराभवाचं खापर कोणावर तरी फोडलं पाहिजे म्हणून राहुल गांधींनी काल पत्रकार परिषद घेतली. राहुल गांधी यांच्या विधानाकडे दुर्लक्ष करा"
प्रत्येकाचं आकर्षण भाजपाकडं : जयंत पाटील भाजपाच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. याबाबत चव्हाण यांना विचारलं असता ते म्हणाले, "प्रत्येक कार्यकर्त्याला हेवा वाटेल असं काम पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस करत आहेत. प्रत्येकाचं आकर्षण भाजपाकडं आहे. मला खात्री आहे की, येणाऱ्या काळात भाजपाकडं अनेक लोक आकर्षित होतील."
हेही वाचा :