केपटाऊन SA vs PAK 2nd Test Day 4 Live Streaming : दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ आज होणार आहे. उभय संघांमधील हा सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स इथं खेळला जात आहे.
पाकिस्तानचं दमदार पुनरागमन : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्ताननं दुसऱ्या डावात 49 षटकांत 1 गडी गमावून 213 धावा केल्या होत्या. मात्र, पाहुणा संघ अजूनही दक्षिण आफ्रिकेच्या 208 धावांनी मागे आहे. सध्या पाकिस्तानसाठी कर्णधार शान मसूद नाबाद 102 आणि खुर्रम शहजाद 8 धावांवर नाबाद आहे. याशिवाय बाबर आझम 124 चेंडूत 81 धावांची खेळी खेळून बाद झाला आहे. तर दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅनसेननं दुसऱ्या डावात 1 बळी घेतला. चौथा दिवस पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचा असेल.
पाकिस्तानला फॉलोऑन :तिसऱ्या दिवशी पाकिस्तानचा पहिला डाव 54.2 षटकांत 194 धावांवर आटोपला. पाकिस्तानकडून बाबर आझमनं पहिल्या डावात सर्वाधिक 58 धावा केल्या. याशिवाय मोहम्मद रिझवाननं 46 धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडानं सर्वाधिक 3 बळी घेतले. तर क्वेना माफाका आणि केशव महाराज यांनी 2-2 गडी बाद केले.
बाबर आझम आणि शान मसूद यांची विक्रमी भागीदारी : पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात शान मसूद आणि बाबर आझम यांनी अप्रतिम फलंदाजी केली. दोन्ही खेळाडू पाकिस्तानी संघासाठी सलामीला आले आणि अगदी सुरुवातीपासूनच ते क्रीजवर स्थिरावले. शान आणि बाबरनं 205 धावांची भागीदारी करुन इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेत कसोटी क्रिकेटमध्ये 200 हून अधिक धावांची भागीदारी करणारी ही पहिली पाकिस्तानी सलामी जोडी आहे. या दोघांपूर्वी पाकिस्तानची कोणतीही सलामी जोडी अशी कामगिरी करु शकली नव्हती.
दक्षिण आफ्रिकेन उभारला धावांचा हिमालय :तत्पुर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या दिवशी 141.3 षटकांत 615 धावांवर बाद झाला. यजमान संघाकडून रायन रिकेल्टननं द्विशतक झळकावलं. रायन रिकेल्टननं 259 धावांची विक्रमी खेळी केली. याशिवाय कर्णधार टेम्बा बावुमानं 106 आणि काइल वेरेनेनं 100 धावा केल्या. पाकिस्तानकडून गोलंदाजीत मोहम्मद अब्बास आणि सलमान आघा यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. तर मीर हमजा आणि खुर्रम शहजादनंही 2-2 विकेट घेतल्या.
आफ्रिकेच्या भूमिवर पाकिस्तानची खराब कामगिरी : दक्षिण आफ्रिकेत पाकिस्तानचा विक्रम तितकासा प्रभावी ठरला नाही. त्यांनी आफ्रिकेत आतापर्यंत 15 कसोटी सामने खेळले आहेत, त्यांनी फक्त 2 जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या दोन्ही बॉक्सिंग-डे कसोटीत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी 2007 मध्ये शेवटच्या वेळी दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर कसोटी सामना जिंकला होता. त्यानंतर त्यांना दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना जिंकता आलेला नाही.
फॉलोऑननंतर सामना जिंकण्याचा विक्रम पाकिस्तान करणार : कसोटी क्रिकेटमध्ये फॉलोऑन मिळाल्यानंतर सामना जिंकणं जवळपास अशक्य असतं. मात्र कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात असं चारवेळा घडलं आहे. सर्वप्रथम इंग्लंडनं 1894 मध्ये फॉलोऑन मिळाल्यानंतर कांगारुंविरुद्ध 10 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 1981 मध्ये इंग्लंडनं अशाप्रकारे विजय मिळवत ऑस्ट्रेलियाचा 18 धावांनी पराभव केला. तसंच 2001 मध्ये भारतानंही ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई कसोटीत फॉलोऑन मिळाल्यानंतर 171 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. तर अलिकडच्या काळात 2023 मध्ये न्यूझीलंडनं फॉलोऑननंतर इंग्लंडचा अवघ्या एका धावेनं पराभव करत नवा इतिहास रचला होता. आता ही संधी पाकिस्तानसनोर आली आहे.