जयपूर RR VS MI IPL 2024 : आयपीएल 2024 चा 38 वा सामना सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला गेला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल संघाला 190 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र राजस्थान संघाचा धडाकेबाज फलंदाज यशस्वी जयस्वाल यानं झंझावाती शतक पूर्ण करुन मुंबईच्या आशेवर पाणी फेरलं. त्यामुळे मुंबईच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. अगोदर राजस्थान रॉयल्सच्या संदीप शर्मानं 5 बळी घेऊन मुंबई संघाचं कंबरडं मोडलं. त्यानंतर यशस्वी जयस्वालनं मुंबईच्या गोलंदाजांची पिसं काढली. त्यामुळे राजस्थाननं 'रॉयल' विजय मिळवला.
मुंबईची फलंदाजी ढेपाळली :राजस्थान रॉयल आणि मुंबई इंडियन्स या दोन तुल्यबळ संघात या अगोदरही सामना झाला होता. त्यात राजस्थान संघानं मुंबईला मात दिली होती. त्यामुळे मुंबई संघाला सोमवारी विजय मिळवून बदला घेण्याची नामी संधी होती. मात्र राजस्थान संघाच्या विरोधात प्रथम फलंदाजी करताना मुंबईची फलंदाजी ढेपाळली. मुंबईचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मानं पहिल्याच षटकात चौकार मारुन धावांचा श्रीगणेशा केला. मात्र पुन्हा एकदा रोहित शर्मा बोल्टचा बळी ठरला. त्यानंतर त्याच्या दुसऱ्यात षटकात इशान किशननं भोपळा न फोडताच तंबूची वाट धरली. सूर्यकुमार यादवही खास काही करू शकला नाही. सूर्यकुमार यादव 10 धावा करुन तंबूकडं निघाल्यानं मुंबईला मोठा धक्का बसला. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर आलेल्या मोहम्मद नबीनं पॉवर प्लेमध्ये 17 धावा कुटल्या. त्यानंतर मुंबईचा डाव गडगडणार असं वाटत असताना तिलक वर्मा आणि नेहल वधेरा या दोन युवा फलंदाजांनी मुंबईचा डाव सावरला. त्यांनी 99 धावांची भागीदारी केली. यात तिलक वर्मानं 45 चेंडूत 65 धावा केल्या. या त्याच्या खेळीत त्यानं 3 षटकार आणि 5 चौकार टोलवले. नेहलनही 24 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 49 धावा कुटल्या. मात्र तिलक वर्माचा बळी गेल्यानंतर मुंबईच्या 3 फलंदाजांनी झटपट तंबूची वाच धरली. राजस्थानचा फिरकी गोलंदाज चहलनं आयपीएलमध्ये खेळताना आपल्या 200 बळींचा टप्पा पूर्ण केला. तर संदीप शर्मानं एकाच डावात 5 बळी घेण्याची विर्कमी कामगिरी केली.
मुंबई संघावर राजस्थानचं यशस्वी वादळ :मुंबई संघानं दिलेलं 190 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान संघाच्या मदतीला पाऊस धाऊन आला. त्यामुळे आता सामन्यावर पाणी फिरणार की काय असं वाटत असतानाचं पाऊस थांबला. त्यानंतर मैदानावर यशस्वी जैयस्वाल या युवा फलंदाजानं खेळाची सूत्रं आपल्या हाती घेतली. यशस्वी जयस्वाल यानं बटलरच्या संगतीनं पॉवर प्लेमध्ये 61 धावा कुटल्या. मात्र पावसानंतर सुरू झालेल्या सामन्यात पियुष चावलानं बटलरला तंबूची वाट दाखवली. त्यानं 25 चेंडूत 6 चौकार लगावत 35 धावा केल्या. यशस्वी जयस्वालनं आपलं धडाकेबाज शतक साजरं केलं. यशस्वीनं 60 चेंडूत 9 चौकार आणि 7 षटकारांसह 106 धावांची धडाकेबाज खेळी केली. तर त्याच्या जोडीला आलेल्या संजू सॅमसननं 28 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकार ठोकत 38 धावा केल्या. मुंबईला केवळ राजस्थानचा एक फलंदाज बाद करण्यात यश मिळालं.
राजस्थान रॉयल्सचा प्लेइंग-11