कानपूर Ravindra Jadeja 300 Wickets : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील कानपूर कसोटी सामन्याचा आज (30 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर आटोपला. भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक तीन बळी घेतले. तर मोहम्मद सिराज, आर. अश्विन आणि आकाश दीपनं प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर जडेजानं शेवटची विकेट घेतली. यासह रवींद्र जडेजानं कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेट पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो सातवा भारतीय गोलंदाज ठरलाय. बांगलादेशकडून कर्णधार मोमिनुल हकनं सर्वाधिक नाबाद 107 धावांचं योगदान दिलं.
रवींद्र जडेजाचं कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक : रवींद्र जडेजानं कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळी पूर्ण केले आहेत. रवींद्र जडेजानं 74 कसोटी सामन्यांत 300 विकेट्स घेतल्या आहेत. कानपूरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी खालिद अहमदला बाद करुन रवींद्र जडेजानं कसोटी क्रिकेटमधील ही मोठी कामगिरी केली आहे. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज खालिद अहमद हा कसोटी क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजाचा 300 वा बळी ठरला आहे.
भारतीय संघाचा सर्वात मोठा मॅचविनर : रवींद्र जडेजा हा भारतीय संघाचा सर्वात मोठा मॅचविनर आहे. रवींद्र जडेजानं 74 कसोटी सामन्यांत 300 विकेट्स घेतल्या असून 3122 धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजानं 13 वेळा कसोटी सामन्यात एका डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय रवींद्र जडेजानं दोन वेळा कसोटी सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.