मॉन्ग कॉक (हाँगकाँग) 6 Sixes in 1 Over : इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू रवी बोपारानं इतिहास रचला आहे. एका षटकात 6 षटकार मारणारा तो जगातील 11वा खेळाडू ठरला आहे. हाँगकाँग आंतरराष्ट्रीय सिक्सेस स्पर्धेत भारताविरुद्ध 39 वर्षीय अष्टपैलू खेळाडूनं हे विशेष यश संपादन केलं आहे. माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पानं भारतीय संघासाठी डावातील चौथं षटक टाकलं. ज्यात रवी बोपारा खूपच आक्रमक दिसत होता. त्यानं पहिल्या 5 चेंडूत 5 उत्कृष्ट षटकार ठोकले. त्यानंतर उथप्पाचा पुढचा चेंडू वाईड झाला. त्यानंतर बोपारानं शेवटच्या चेंडूवरही गगनचुंबी षटकार ठोकून इतिहासाच्या पानात आपलं नाव नोंदवलं.
रवी बोपारानं अवघ्या 14 चेंडूत केल्या 53 धावा : सामन्यादरम्यान रवी बोपारा भारताविरुद्ध अतिशय आक्रमक दिसला. संघासाठी डावाची सुरुवात करताना त्यानं केवळ 14 चेंडूंचा सामना केला. दरम्यान, तो 378.57 च्या स्ट्राइक रेटनं 53 धावा (रिटायर्ड हर्ट) करण्यात यशस्वी झाला. यात त्यानं 8 उत्कृष्ट षटकार मारले. बोपारा व्यतिरिक्त माजी इंग्लिश अष्टपैलू समित पटेलनंही भारताविरुद्ध चांगली फलंदाजी केली. सलामी करताना त्यानं एकूण 18 चेंडूंचा सामना केला. दरम्यान, त्यानं 283.33 च्या स्ट्राइक रेटनं 51 धावा (रिटायर्ड हर्ट) चं योगदान दिले. पटेलनं या उत्कृष्ट खेळीत 4 चौकार आणि 5 षटकार लगावले.
रॉबिन उथप्पानं दिल्या 1 षटकात 37 धावा : भारताकडून कर्णधार रॉबिन उथप्पा हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्यानं संघासाठी फक्त 1 षटक टाकलं. दरम्यान, 37.00 च्या इकॉनॉमीमध्ये 37 धावा देण्यात आल्या. यात त्याला कोणतंही यश मिळालं नाही.